Advertisement

“हे सरकार ५ वर्षे काय २५ वर्षे टिकेल”

जोपर्यंत तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मनात आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे काय २५ वर्षे टिकेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

“हे सरकार ५ वर्षे काय २५ वर्षे टिकेल”
SHARES

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु जोपर्यंत तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मनात आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे काय २५ वर्षे टिकेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मा. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामागे भाजपची महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची खेळी असावी, अशी शंका हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केली.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष शिवसेनेचे नेते फोडत असल्याचा आरोप सरनाईक यांनी या पत्रात केला आहे. मात्र राज्यात अशी कोणतीही परिस्थिती नाही. राज्यातील सर्वात मोठ्या गोकूळ दूधसंघात शिवसेनेचा प्रवेश करून घेत ६ संचालक निवडून आणले असल्याचा दाखला हसन मुश्रीफ यांनी दिला.

हेही वाचा- मोदी सरकार महाविकास आघाडी अस्थिर करण्याच्या प्रयत्नात, काँग्रेसचा आरोप

अशा कोणत्याही लेटरबॉम्बद्वारे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोपर्यंत हे सरकार ५ वर्षेच काय २५ वर्षे टिकेल, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

याआधी ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचं काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजपा मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचं, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत.

परंतु या दबावतंत्रामुळे भाजपचं सत्तेचं दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असं ठाम मत नाना पटोले यांनी मांडलं आहे.

(maha vikas aghadi govt will continue for next 25 years says ncp leader hasan mushrif)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा