SHARE

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी दादरच्या चैत्यभूमी इथं जाऊन डाॅ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि काही मंत्री देखील उपस्थित होते. इंदू मिल इथं उभं राहणारं डाॅ. आंबेडकरांचं स्मारक २०२० पर्यंत पूर्ण होईल, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलं.


स्मारकाचं काम धीम्या गतीने

सन २०११ मध्ये आघाडी सरकारच्या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलमधील जमीन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकार बदललं आणि २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलमधील डाॅ. आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजनही झालं. मात्र अद्याप या स्मारकाचं काम म्हणावं त्या गतीने पुढं सरकलेलं नाही.


वाहतूक व्यवस्था

डाॅ. आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी आंबेडकरी जनसमुदाय हजारोंच्या संख्येने दादरमध्ये दाखल झाला आहे. यामुळे दादर परिसरात वाहनकोंडी होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवरील वाहतूक वळवली आहे.

त्यानुसार वीर सावरकर रोड, रानडे रोड, एन.सी. केळकर रोड, केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर), गोखले रोड (दक्षिण आणि उत्तर), तिळक ब्रिज, एस.के. बोले रोड आणि भवानी शंकर रोड इथं पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. सेनापती बापट मार्ग, महीम, दादर, कामगार स्टेडियम, प्रभादेवीतील इंडिया बुल्स फायनांन्स सेंटर, वरळीतील आदर्श नगर मैदान, माहीममधील रेती बंदर, माटुंगातील लक्ष्मी नप्पू रोड आणि आर.के. रोड वर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या