Advertisement

महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनवर एकमत? लवकरच घोषणेची शक्यता

आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही, तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल.

महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनवर एकमत? लवकरच घोषणेची शक्यता
SHARES

कोरोनाचं (coronavirus) अनर्थचक्र थांबवायचं असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही, तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल. सर्व पक्षीय नेत्यांना माझं आवाहन आहे की जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्यास सहकार्य द्यावं, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत राज्यात पूर्ण लाॅकडाऊनचे संकेत दिले आहेत.

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला.

पॅकेज जाहीर करा

या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी संपूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली. सरकारने कठोर निर्णय घेताना हातावर पोट असणाऱ्यांचा आधी विचार करावा. त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी केली. सोबतच सरकारला आम्ही सहकार्य करू, पण त्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या आणि तुमच्या मंत्र्यांना समज द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. 

जीव वाचवण्याला प्राधान्य

बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचं अनर्थचक्र थांबवायचं असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. एका बाजूला जनभावना, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल.  

आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावं लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असलं पाहिजे. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने विचार सुरू आहे. कोरोना सर्वांनाच लक्ष्य करीत आहे. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागात आणि क्षेत्रात आहे.  

हेही वाचा- 'ब्रेक द चेन' अंतर्गत काय सुरू, काय बंद?; मनात शंका असेल तर 'हे' वाचाच

निर्बंध असूनही घराबाहेर

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणं सोपं होतं. परंतु नवीन गाइडलाईन जारी करूनही बाजारांत गर्दी होत आहे. विवाह समारंभांमध्येही नियम पाळले जात नाहीत. वर्क फ्राॅम होम आवाहन करूनही कर्मचारी घराबाहेर पडत आहेत. अशा स्थितीत ही साखळी तोडण्यासाठी विकेंड लाॅकडाऊनशिवाय पर्याय नव्हता, असं म्हणणं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मांडलं.

तरूणांमध्ये मोठा संसर्ग

येत्या १५ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तरूणांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. युकेने २ आधीच महिने कडक लॉकडाऊन केला. पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केलं. युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतंय. लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार  केला जाईल. कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये याचा जरुर विचार केला जाईल. त्यामुळे सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविलं पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसंच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

हेही वाचा- Weekend Lockdown : मुंबईत सर्वत्र शुकशुकाट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा