Advertisement

बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देणार

राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देणार
SHARES

राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील १ वर्षाचं मानधन देणार आहे. तसंच, महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात ५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. अमृत उद्योगातील ५ हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. 

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. सर्वांचे मोफत लसीकरण झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झालं आहे. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं सांगतानाच सीएम रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन थोरात यांनी केलं.

जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी पाच लोकांच्या लसीकरणाचा भार उचलावा, असं अभियान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांनी सुरू केलं आहे. ते स्वत: त्यांच्या आणि इतर पाच जणांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार आहेत. हा स्तुत्य उपक्रम असून सर्वांना प्रतिक पाटील यांचं अनुकरण करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

आमच्या अमृत उद्योगात एकूण पाच हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या लसीकरणाचा खर्चही आम्ही उचलणार असून हा पैसा सीएम रिलीफ फंडात देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा