निर्णय झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही!

 Mumbai
निर्णय झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही!

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण देता येत नसेल, तर सत्तेतून पायउतार व्हा, असा निर्वाणीचा इशारा मराठा मोर्चातील भाषणादरम्यान तरूणींनी राज्य सरकारला दिला. या व्यतीरिक्त कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी, ६ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलती इत्यादी मागण्या या तरूणींनी ठासून केल्या.

एका बाजूला भाषण सुरू असताना मराठा मोर्चा शिष्टमंडळातील तरूणींनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. तर दुसऱ्या बाजूला जोपर्यंत सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदानातून हलणार नाही, असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला. यामुळे मोर्चाची सांगता झाली असली, तरी मैदानातील गर्दी कायमच होती.मुंबईतला मोर्चा मराठा समाजाचा शेवटचा निर्णायक मोर्चा म्हटला जात आहे. सकाळी ११ वाजता भायखळ्यातील जीजामाता उद्यानातून सुरू झालेला मोर्चा जे. जे. उड्डाणपुलावरून आझाद मैदानात पावणे एकच्या सुमारास पोहोचला. मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमुळे आझाद मैदान पूर्णपणे भरून गेले होते. काही मोर्चेकऱ्यांनी तर जवळच्या झाडांचाही आश्रय घेतला.

तरूणींच्या भाषणाला सुरूवात झाली, तरी मोर्चेकरी मैदानात येतच होते. भाषणादरम्यान किमान २ ते ३ लाख मोर्चेकरी आझाद मैदान आणि परिसरात उपस्थित असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. एका बाजूला भाषण सुरू असताना मराठा समाजातील तरूणींचे एक शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन विधीमंडळात पोहोचले.


मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन होण्याची शक्यता

या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनानंतर मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा राज्य सरकारकडून होणे अपेक्षित आहे. या समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळ मान्यतेची गरज राहणार नाही. तसेच राज्य सरकार मराठा विद्यार्थ्यांना ६ लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी ६० टक्के गुणांची असलेली अट ५० टक्के करण्याचीही शक्यता आहे.

Loading Comments