सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरेंना कानपिचक्या

Dadar (w)
सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरेंना कानपिचक्या
सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरेंना कानपिचक्या
सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरेंना कानपिचक्या
See all
मुंबई  -  

''सतत सकारात्मक बदल हे प्रगतीचे लक्षण आहे'' हे वाक्य जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 2006 साली केलेल्या भाषणामधील असलं तरी, या वाक्याचा वापर करुन आता या संकल्पनेची अंमलबजावणी पक्षात व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांच्या अगदी जवळ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकीच्यावेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियाचा वापर करुन आपली भूमिका मांडली होती तर आता त्यांचे नेते पक्षाबाबतची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत. मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी झालेल्या बैठकीला हे दोन्ही पदाधिकारी उपस्थित नव्हते. राज ठाकरे यांना कधीही भेटता येणाऱ्या संदीप देशपांडे यांनाही राज ठाकरे यांना सांगण्याऐवजी फेसबुकवर पोस्ट टाकावी लागली? अशी पोस्ट टाकल्यानंतर हे दोन्ही पदाधिकारी राज ठाकरे यांच्या जवळ होते की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. या पोस्टमुळे स्पष्ट होते की राज ठाकरे, मनसे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात समन्वयाचा अभाव आहे किंवा कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची पूर्ती  वरच्या फळीतील नेत्यांना करता येत नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर माजी आमदार आणि मनसेचे  नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितलं की, पदाधिकारी आणि नेत्यांनी आपली भूमिका राज ठाकरे यांच्या समोर मांडली. तसेच पदाधिकारी आणि नेते पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवू शकत नसल्याने राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी झापलेही.

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एकसारखी पोस्ट टाकून मनसेमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे हे स्पष्ट केले आहे. या पोस्टबद्दल संदीप देशपांडे यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर अमेय खोपकर यांनी राज ठाकरे यांच्याशी भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. त्यानंतर बोलू असं स्पष्ट केलं. मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेले शिशिर शिंदे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती. तिकीट वाटप आणि पक्षाच्या कामामध्ये सतत डावलल्यामुळे नाराज आहेत, असं त्यांनी 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना आधीच सांगितलं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या बैठकीला मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना बोलावलं नव्हतं. तर मनसेमध्ये असलेले नेते, सरचिटणीस असलेले नेते पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवू शकले नाहीत. पक्ष लोकांमधून कमी होत चालला आहे. पक्ष याच स्थितीमध्ये राहिला तर स्पर्धेमध्ये पक्षाला कुणी स्पर्धक म्हणून बघणारही नाही. काम करत नसेल तर पदे खाली करण्यात यावी. जे कार्यकर्ते काम करतात त्यांना पदे दिली जात नाहीत. पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली जात नाही. अशी नाराजी सध्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, आकांक्षा प्रत्येक वेळी राज ठाकरेपर्यंत पोहोचवता येत नाहीत. आज मोठया पदांवर असलेल्या नेत्यांनी कोणती आंदोलनं केली आहेत? नेहमी अशा आंदोलनामध्ये दुसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते पुढाकार घेतात. राज ठाकरे यांच्यापर्यंत या भावना पोहोचवल्यानंतरही बदल होत नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे या पोस्टना मनसे कार्यकर्त्यांनी दिलेल्या लाईक्स व कमेंटच्या प्रतिसादावरुन स्पष्ट दिसत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.