Advertisement

अविनाश, मै हू ना! राज ठाकरेंचा एवढाच निरोपच पुरेसा…

खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांना आलेल्या नोटिशीची दखल घेतली आहे. एवढंच नाही, तर त्यांना खास निरोप देखील पाठवला आहे.

अविनाश, मै हू ना! राज ठाकरेंचा एवढाच निरोपच पुरेसा…
SHARES

वसई-विरार महापालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीनुसार जाधव यांना विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालात ४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. ही नोटीस नसून आपण केलेल्या कामाचं सरकारने दिलेलं बक्षीस असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती. या नोटिशीवरून ठाण्यातील राजकारण तापलेलं असताना खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांना आलेल्या नोटिशीची दखल घेतली आहे. एवढंच नाही, तर त्यांना खास निरोप देखील पाठवला आहे. (mns chief raj thackeray backs avinash jadhav in deportation notice from vasai police)

याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अविनाशला अटक झाली व तडीपारची नोटीस देण्यात आली. त्या अनुषंगाने सकाळी राजसाहेबांकडे गेलो. तिथं अविनाश विषयी सखोल चर्चा झाली व साहेबांच्या निर्देशानुसार ठाणे गाठलं. ठाणे इथं संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राजकारणात विविध पक्ष असतात, पण तुम्हाला माहीतच आहे आपला "मनसे परिवार" आहे, आणि परिवारात कोणी अडचणीत असल्यास सर्व परिवारच ठामपणे त्याच्या मागे आपली पूर्ण ताकद लाऊन उभा असतो आणि आपले परिवार प्रमुख राजसाहेब हे सर्व अक्षरशः सर्व कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करतात व जपतात. अविनाशबद्दल तर ही तळमळ अजून तीव्रतेने मी स्वतः आज अनुभवली. तिथून निघताना बाकीच्या चर्चेबरोबरच साहेबांनी एकच निरोप अविनाशला दयायला सांगितला, अविनाश, मै हू ना! यात सगळंच आलं.

हेही वाचा - मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस


ठाण्याला जाऊन अविनाशशी भेट झाली व त्याला ठामपणे आम्ही सर्व सोबत आहोत व साहेबांचा विशेष संदेश सांगितला. काय ताकद असते ना केवळ तीन शब्द परंतु कार्यकर्त्यांत १०० हत्तींचं बळ येतं. अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा. जनतेसाठी आमचा लढा हा असाच अविरतपणे कायम राहील.

कोविड सेंटरसाठी वसईत केलेल्या आंदोलनाप्रकरणी अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड अशा ५ जिल्ह्यांमधून २ वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी ही नोटीस बजावली आहे. ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहून खुलासा करण्याचे निर्देश या या नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत. कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करत असतानाच त्यांना ही नोटीस बजावण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement