Advertisement

घटस्थापनेच्या मुहूर्तावर रंगलेला फुटबॉलचा खेळ


घटस्थापनेच्या मुहूर्तावर रंगलेला फुटबॉलचा खेळ
SHARES

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ होईल अशी जी काही अपेक्षा होती ती फोल ठरली आहे. आता पुन्हा काही दिवसांची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.

राज ठाकरेंनी व्हेरिफाईड फेसबुक पेज सुरू करून मोदींच्या सोशलमंत्राचा स्वीकार करत मनसेही आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरण्यात कमी राहणार नाही, असे संकेत दिले आहेत.

तर, नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडताना नितेश राणे आणि कालिदास कोळंबकरांना काँग्रेसमध्येच ठेवत आपले पुढचे पत्ते झाकूनच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

आणि तिकडे कोल्हापुरात सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना नावाची वेगळी पक्षसंघटना स्थापन केली असली तरी या दोघांच्या घटांपुढे त्यांची घटस्थापना पार फिकी पडली, असेच म्हणावे लागेल.

राज ठाकरेंनी फेसबुक पेजवर त्यांच्या स्टाईलने झळकण्याचा प्रयत्न केला असला तरी तो नेहमीप्रमाणे ठसकेबाज ठरला नाही. राजनी बुलेट ट्रेनच्या निमित्ताने मुंबई वाचवण्याची हाक देत मोदींपासून राणेंपर्यंत टीकास्त्र सोडताना सर्वपक्षसमभाव जपला.

दाऊदच्या मुसक्या बांधण्याची मागणी कशी फलद्रुप होईल आणि भाजपा सरकार कसं दाऊदच्या अटकेचा फायदा घेऊन निवडणुका लढवेल, असे भाकित करत राज ठाकरेंनी कुडमुड्या राजकीय ज्योतिषांच्या पोटातच गोळा आणला असेल.

त्यामुळे, कधीकाळी मोदीप्रेमात बुडालेले राज ठाकरे आता मोदींच्या थापांना फेसबुकवरूनच सर्वांसमोर आणण्यासाठी धडपडतील, असे मानायला हरकत नाही.

दुसरीकडे, राणेंनीही कुडाळमधून नेहमीच्या स्वभावानुसार, काँग्रेसची अंडीपिल्ली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कुणी कसं फसवलं याचा संपूर्ण वृत्तांत सांगताना त्यांनी भाजपा सोडून सर्वांवर डागलेली तोफ त्यांच्या भविष्यातील सस्पेन्स ठेवण्याचा प्रयत्न करत असलेल्या वाटचालीचीच दिशा दाखवते.

त्यांनी भलेही भाजपाशी गाठ बांधली नाही तरी भाजपाबरोबरच जमलेली निसरगाठ मात्र त्यांच्या वक्तव्यांमधून जाणवण्याइतपत जनताही दूधखुळी नाही.

राणे आणि राजमध्ये नाव न घेता रंगलेल्या फुटबॉल सामन्यानेही अनेकांचे मनोरंजन झाले. राज ठाकरेंनी राणेंचा फुटबॉल कुणालाच नको असल्याची मार्मिक टीका करत ठाकरे शैलीचा दाखला दिला. त्यावर, राणेंनीही ज्यांचा स्वतःचाच फुटबॉल झालाय, त्यांना काय उत्तर द्यायचं, असा खवचट मालवणी हल्लाबोल केला.

असो, घटस्थापनेच्या दिवशी नवरात्रीची पहिली माळ सजत असताना राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या माळा फुटण्याशिवाय काहीच घडले नाही.

थोडक्यात सांगायचे तर, राज असो, राणे असो किंवा सदाभाऊ असो, या तिघांच्याही वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा यातून दिसून आल्या.

आता त्यांच्या या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांवर जनता विश्वास दाखवेल का, याचे उत्तर 2019 मध्येच मिळेलच. परंतु, तत्पूर्वी या तिघांचाही झालेला फुटबॉल राजकारणाच्या मैदानात सत्ताधारी  आणि विरोधी संघांपैकी कोण कसा लाथाडून फायदा करवून घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा