Advertisement

भाजपाकडून आसिफा बलात्काराचं राजकारण- राज ठाकरे

बलात्कार झालेली व्यक्ती ही हिंदू किंवा मुस्लिम नाही, तर या देशाची मुलगी होती. तरीही 'भारत माता की जय' म्हणणाऱ्यांकडून आसिफा बलात्कार प्रकरणाला धार्मिक रुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बलात्कार करणारा कुणीही असो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असो. असलं कृत्य करणाऱ्या तात्काळ आणि ताबडतोब तिथल्या तिथंच ठेचून काढायला हवं.

भाजपाकडून आसिफा बलात्काराचं राजकारण- राज ठाकरे
SHARES

आसिफा बलात्कार प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर सडकून टिका केली. भाजपा सरकार हे जातीच्या नावावर दंगली भडकावू पाहत असल्याचं सांगत बलात्कार झालेली व्यक्ती ही हिंदू किंवा मुस्लिम नाही, तर या देशाची मुलगी होती. तरीही 'भारत माता की जय' म्हणणाऱ्यांकडून आसिफा बलात्कार प्रकरणाला धार्मिक रुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बलात्कार करणारा कुणीही असो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असो. असलं कृत्य करणाऱ्या तात्काळ आणि ताबडतोब तिथल्या तिथंच ठेचून काढायला हवं. सौदी अरेबियायासारखं हात आणि मुंडक छाटून टाकायला हवं. जोवर असं होत नाही तोवर बलात्कार करणारा वठणीवर येणार नाही, असं म्हणत त्यांनी लोकभावनेला हात घातला.


भाजपा बलात्काऱ्यांना पाठिशी घालतेय

मुलुंड पश्चिम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० महिलांना रिक्षांचं वाटप राज यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी बोलतांना राज यांनी आसिफा बलात्कार घटनेबाबत सरकारच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. एका बाजूला महिलांना महत्व देऊन त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी मनसे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ८ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला जातोय. हे ऐकून वाईट वाटतं. प्रचंड राग येतोय. ८ वर्षाच्या त्या मुलीला धर्म कशाशी खातात ते माहीत नाही. पण तिला मंदिरात नेऊन ५-६ जणांनी हे कृत्य केलं. तिचा गळा दाबून मारलं. तेवढ्यानंही त्यांचं समाधान झालं नाही म्हणून दगडानं ठेचून मारलं.



मंदिरातले देव तरी कुठे गेले होते?

त्या बलात्कारी लोकांना भाजपा सरकार पाठिशी घालत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धर्माच्या नावावर दंगली घडवायचा प्रयत्न भाजपा सरकार करत असल्याची भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्या मुलीवर मंदिरात नेऊन बलात्कार केला. मग त्यावेळी मंदिरातले देव तरी कुठे गेले होते? असाही उद्विग्न सवाल त्यांनी केला.


तर घुसखोरांना बाहेर काढा

त्या मुलीला मारलं ते बरं झालं. नाही तर पाकमध्ये जावून आंतकवादी बनली असती, असं आता भाजपावाले बोलताहेत. पण या चिमुरडीचा देशाला काय धोका आहे? उलट देशात जे बांग्लादेशी मुसलमान आहे, जे पाकिस्तानी मुसलमान घुसखोर आहेत, त्यांच्यापासून या देशाला खरा धोका आहे, हिंमत असेल, तर त्यांना बाहेर काढून दाखवा, असं आव्हानही त्यांनी दिलं. बलात्कार करणारा हा कुणीही असो, त्याला तिथल्या तिथे ठेचून मारा. कारण ते कोर्टातून सुटतात. त्यांना भिती म्हणून काहीही राहिलेली नाही. त्यामुळे गुन्हा केला त्याला शिक्षा व्हायलाच हवी, असंही त्यांनी सांगितलं.



आता बाबासाहेब कसे आठवले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाबासाहेब आंबेडकर आठवले? हेच त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताना का नाही सांगितलं. असं म्हणत राज यांनी पंतप्रधानांच्या प्रतिमेवर टीका केली.


नाणार प्रकल्प कोकणात नाहीच

नाणार प्रकल्प हा कोणत्याही परिस्थिती कोकणात होणार नाही. तुम्ही चंद्रावर न्या नाही तर कुठेही न्या पण कोकणात हा प्रकल्प होऊ देणार नाही, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लंख जॅकेट मुख्यमंत्री अस करुन या प्रकल्पालगतच्या जमीन राजकीय लोकांनीच लाटल्या असल्याचाही गौप्यस्फोट केला.



सत्तेत नसूनही दिला रोजगार

सत्ता हाती नसतानाही महाराष्ट्रातील बेरोजगार आणि महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न मनसेच्यावतीने केला जात आहे. याठिकाणी १०० महिलांना रिक्षांचं वाटप केले जातंय. त्यामुळे बोलू ते निश्चित करून. हाती सत्ता नसताना जर एवढं करू शकतो, हाती सत्ता आली तर काय करू, असाही सवाल त्यांनी केला.



हेही वाचा-

आशिष शेलारांनी का घेतली राज ठाकरेंची भेट?

कमळाच्या गोटात घड्याळाची टिकटिक! पवारांनी घेतली शेलारांची भेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा