Advertisement

बंद खोलीत ‘तो’ निर्णय तर झाला नाही ना?,आत्ताच सांगा नंतर कटकट नको; मनसेची मिश्कील टिप्पणी

पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यावरून संदीप देशपांडे यांनी मिश्कील सवाल उपस्थित केला आहे.

बंद खोलीत ‘तो’ निर्णय तर झाला नाही ना?,आत्ताच सांगा नंतर कटकट नको; मनसेची मिश्कील टिप्पणी
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अर्धा तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बंद खोलीत ‘वन टू वन’ चर्चा केली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील दोन्ही पक्षांना एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणं शक्य झालं नाही. भाजपचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. या चर्चेत प्रमुख सत्तापदांसोबतच मुख्यमंत्रीपदही समसमान वाटून घेण्यावरून तयार झालेला वाद पुढं विकोपाला गेला. आणि त्यातूनच महाविकास आघाडीचा उदय झाला.

आताही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी भेटले. या भेटीनंतर पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यात पुन्हा अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यावरून संदीप देशपांडे यांनी मिश्कील सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा- “मोदी-ठाकरे भेटीनंतर चर्चा तर होणारच…”

संदीप देशपांडे म्हणतात, आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको.

त्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच. चर्चा सुरू झाली असेल, तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासोबतच इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं मला सांगण्यात आलं. ते तासभर सगळ्यांना भेटले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात अर्धा तास वन टू वन चर्चा झाली. या दोन्ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

या भेटीवरून ज्या कुणाला राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत, त्यांना काढू देत. नरेंद्र मोदींविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे. ठाकरे परिवार आणि मोदींचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनात किती आदर आहे, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हीही नेहमीच त्यांचा आदर केला आहे. नवीन सत्तासमीकरणांचा विषय इथं येत नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

(mns leader sandeep deshpande reaction on narendra modi and uddhav thackeray delhi meeting)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा