Advertisement

“मोदी-ठाकरे भेटीनंतर चर्चा तर होणारच…”

पंतप्रधानांनी अर्धा तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘वन टू वन’ चर्चा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या समीकरणांची चर्चा रंगायला लागली आहे.

“मोदी-ठाकरे भेटीनंतर चर्चा तर होणारच…”
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. तासभर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधानांनी पुन्हा अर्धा तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘वन टू वन’ चर्चा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या समीकरणांची चर्चा रंगायला लागली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची बैठक जवळपास तासभर चालली. या बैठकीत राज्याच्या प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित प्रश्नांवर पंतप्रधान  सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यानंतर पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला.

त्यावर बोलताना संजय राऊत (sanjay raut) म्हणाले की, जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच. चर्चा सुरू झाली असेल, तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासोबतच इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं मला सांगण्यात आलं. ते तासभर सगळ्यांना भेटले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात अर्धा तास वन टू वन चर्चा झाली. या दोन्ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

हेही वाचा- पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्या बैठकीत ‘या’ १२ विषयांवर झाली चर्चा

या भेटीवरून ज्या कुणाला राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत, त्यांना काढू देत. नरेंद्र मोदींविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे. ठाकरे परिवार आणि मोदींचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनात किती आदर आहे, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हीही नेहमीच त्यांचा आदर केला आहे. नवीन सत्तासमीकरणांचा विषय इथं येत नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष नसावा. केव्हातरी संघर्षाला पूर्णविराम द्यावा लागतो. केंद्र सरकार राज्यांचं पालक म्हणून काम करत असतं. राज्यांच्या संकटकाळात केंद्रानं, पंतप्रधानांनी मदत करावी ही राज्यांची भूमिका असते. त्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात सुसंवाद असावा, ही भूमिका आमची कायम राहिली आहे. आज जर पंतप्रधानांनी तासभर महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतले आहेत, तर संघर्षाची भाषा कशाला. संवाद वाढतोय आणि तो वाढत राहावा, अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.

(sanjay raut reaction on narendra modi and uddhav thackeray delhi meeting)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा