Advertisement

खडी टाकल्यानं शिवाजी पार्कमध्ये मनसेचं धरणं आंदोलन

मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलं आहे.

खडी टाकल्यानं शिवाजी पार्कमध्ये मनसेचं धरणं आंदोलन
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलं आहे. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरु केलं आहे.

शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि शिवाजी पार्क जवळच्या रहिवाशांनी घेतला आहे. यावरून शिवसेना आणि मनसेत शीत युद्ध सुरु आहे.

याप्रकरणी शिवाजी पार्कमध्ये कोणताही रस्ता होणार नाही, असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. प्रत्यक्षात या खडीवर माती टाकण्यात येणार आहे. त्याखाली पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी ग्रव्हल्स टाकण्यात येत असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलं. पण मनसेनं त्याला आक्षेप घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवाजी पार्क परिसरातील नागरिक, क्लब सदस्य आणि खेळाडूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. पालिकेकडून शिवाजी पार्क मैदानात सुशोभिकरणाचं काम सुरु आहे. हे काम सुरू असतानाच शिवाजी पार्क मैदानाच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खडी टाकून रस्ता बनवण्यात आला आहे.

याला मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. सुशोभिकरणाला विरोध नसून मैदानात कुठल्याही कारणास्तव खडी नको, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तर हे काम करताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास हे काम थांबवण्यात आलं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा