Advertisement

सरकारी रुग्णालयांमध्ये एमआरआय मशीनची कमतरता


सरकारी रुग्णालयांमध्ये एमआरआय मशीनची कमतरता
SHARES

सरकारी रुग्णालयांमध्ये एमआरआय काढण्यासाठी रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे एमआरआय मशीनची संख्या वाढवण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणजे पीपीपी मॉडेलचा सरकार विचार करीत आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.


पीपीपी माॅडेलचे धोरण

गेल्या महिन्यात नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून राजेश मारू या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची सुरक्षा, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि एमआरअाय मशीनची संख्या वाढवणे, या संदर्भातील लक्षवेधी अामदार हेमंत टकले यांनी उपस्थित केली. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री पाटील यांनी एमआरआय विभागात घ्यावयाच्या खबरदारीचे सूचना फलक रुग्णालयात आधीच लावलेले आहेत. मात्र त्यातील सूचनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी निवासी डॉक्टर, वॉर्डबॉय, नर्स, आया यांना योग्य प्रशिक्षण दिलं जाईल. तसंच काय करावं आणि काय करू नये, यासंदर्भात सूचना दिल्या जातील. एमआरआय सुविधा वाढविण्यासाठी पीपीपी मॉडेलचं धोरण करून तसे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती रणजित पाटील यांनी दिली.


एमअारअायसाठी एक-दोन दिवस

राज्यमंत्री पाटील यांनी रुग्णाला एमआरआय करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची माहिती देताना सांगितले की, पालिका रुग्णालयांत आंतररुग्णांची एमआरआय चाचणी एक ते दोन दिवसांत करण्यात येते. बाह्य रुग्णांच्या एमआयआर चाचण्या गरजेनुसार एक ते दोन महिन्यांच्या आत केल्या जातात. सध्या केईएम आणि लोकमान्य टिळक रुग्णालयात एमआरआय चाचणीची सुविधा आहे. त्याचप्रमाणे कूपर रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालय येथे ही सेवा सार्वजनिक-खासगी तत्वावर उपलब्ध आहे. केईएम आणि लोकमान्य टिळक पालिका रुग्णालयात अतिरिक्त एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा