कमनशिबी महापौर !

  CST
  कमनशिबी महापौर !
  मुंबई  -  

  आयत्यावेळी उमेदवारी मिळवून महापौरपदी विराजमान झालेल्या विश्वनाथ महाडेश्वर हे खऱ्या अर्थाने कमनशिबी ठरले आहेत. आधीच शिवाजी पार्क येथील महापौरांचे निवासस्थान गेले आणि त्यापाठोपाठच त्यांच्या वाहनावरील लाल दिवाही लवकरच जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेतील इतर नगरसेवकांच्या तुलनेत महाडेश्वर हे नशिबवान असले तरी, प्रत्यक्षात या पदाचा मान असलेले शासकीय निवासस्थान आणि लाल दिव्याची गाडी जाणार असल्यामुळे आजवरच्या महापौरांच्या तुलनेत ते कमनशिबी ठरताना दिसत आहेत.

  राज्यपाल, मुख्यंमंत्र्यासह सर्व मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवा काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर राज्याच्या राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाहनावरील लाल दिवा काढला. आता इतर मंत्र्यांसह महापौरांच्या वाहनावरील लाल दिवा हटवला जाणार आहे. मात्र, सध्या तरी आपल्या वाहनावरील लाल दिवा काढण्यास महापौर महाडेश्वर यांनी नकार दिला आहे. सरकारी अध्यादेश जारी झाल्यानंतरच आपण लाल दिवा काढू, असा निर्धार त्यांनी केला आहे. परंतु अध्यादेश आल्यानंतर त्यांना आपल्या वाहनावरील लाल दिवा उतरवावाच लागणार आहे.

  महापालिकेत महापौर आणि महापालिका आयुक्त यांनाच लाल दिव्याची गाडी दिली जाते. परंतु लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याची महापौरांची शान निघून जाणार आहे. यापूर्वीच शिवाजी पार्कमधील महापौरांचे निवासस्थान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांचे निवासस्थान हे राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांच्या निवासस्थानात हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु याला महापौरांनीच हरकत घेत आपल्याला मलबार हिलमधील अतिरिक्त आयुक्त राहत असलेली दोन निवासस्थानं एकत्र करून महापौरांसाठी निवासस्थान बनवले जावे, अशी मागणी केली आहे. शिवाजीपार्क येथील महापौरांचे निवासस्थान हे ब्रिटिशांपासूनचे आहे. सध्या पर्यायी निवासस्थानाची व्यवस्था होईपर्यंत शिवाजीपार्क येथीलच महापौर निवासस्थानात महाडेश्वर हे राहत असले तरी, हे निवासस्थान येत्या काही महिन्यांत सोडावे लागणार आहे. 

  लाल दिवा आणि शिवाजी पार्कमधील निवासस्थान गेलेले आहे. त्यातच राणीबागऐवजी मलबार हिलमध्ये निवासस्थानाची मागणी प्रशासन मान्य करताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर महापालिका मुख्यालयातील महापौरांच्या कार्यालयालाही गळती लागल्यामुळे गळक्या कार्यालयात बसण्याची वेळ या विद्यमान अभ्यासू महापौरांवर आलेली आहे. त्यामुळे लाल दिव्याविना आणि शिवाजी पार्कमधील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शिवाजीपार्कमधील निवासस्थानातील वास्तव्याविना मुंबईचा कारभाराचा गाडा महाडेश्वर कशाप्रकारे पुढे हाकतात, हेच पहायचे आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.