Advertisement

शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या 'या' ४ दिग्गज नेत्यांचं राजकीय अस्तित्व पणाला


शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या 'या' ४ दिग्गज नेत्यांचं राजकीय अस्तित्व पणाला
SHARES

कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला... शिवसेना जिंदाबाद!! अशा घोषणांनी आजही शिवसेनेच्या सभा दुमदुमून जातात. शिवसेना आणि शिवसैनिकांचे नाते सर्वश्रुत आहे. याच शिवसैनिकांच्या जोरावर संघटना ते राजकीय पक्ष अशा वाटचालीत शिवसेनेने अनेक वादळे लीलया पेलली. ठराविक अंतराच्या काळात शिवसेनेला काही हादरेही बसले. पण त्यातूनही पक्ष सावरला, म्हणूनच तर आजही शिवसेनेचा भगवा जोमाने फडकतोय. या उलट ज्या मोठ्या नेत्यांनी शिवसेनेला काही वर्षांपूर्वी राम राम ठोकला. त्याच नेत्यांचे राजकीय अस्तित्व सध्या पणाला लागले आहे. काय आहे सद्यस्थितीत या नेत्यांची अवस्था? याचा लेखाजोखा मांडणार हा स्पेशल रिपोर्ट.

छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे एकेकाळचे शिवसेनेचे वाघ. मात्र या वाघांनी संघटनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता शिवसेनेचे काय होणार? असे चित्र निर्माण झाले होते. तो काळ शिवसेनेसाठी कठीण होता. तरीही शिवसैनिकांनी न डगमगता काळावरही मात केली.


छगन भुजबळ -

भुजबळ हे 1973 साली मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. यानंतर 1973 ते 1984 दरम्यान महापालिकेत विरोधी पक्षनेते होते, तर 1985 मध्ये पहिल्यांदा महापौर झाले. 1991 मध्ये ते दुसऱ्यांदा महापालिकेत मुंबईचे महापौर झाले. मात्र 1991 मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.



गिरणगावात जेव्हा केवळ शिवसेनेचा आवाज घुमायचा आणि शिवसेनाप्रमुखांचा शब्द अंतिम असायचा, अशा काळात छगन भुजबळांनी बंड पुकारले. पक्षात बंडाळी केल्याने शिवसैनिक संतापले आणि त्यांनी छगन भुजबळांवर हल्ला देखील केला होता. यात भुजबळ बचावले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या भुजबळांच्या विरोधात बाळा नांदगावकर नावाच्या नवख्या तरुण शिवसैनिकाला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आणि या तरुणाने भुजबळांना चारीमुंड्या चीत करत ‘जाएंट किलर’ अशी उपाधी मिळवली.

त्यानंतर भुजबळही थांबले नाहीत. भुजबळांनी थेट नाशिक गाठले आणि त्यांनी तेथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विधानसभेवर जिंकून गेलेल्या भुजबळांनी आघाडीच्या काळात अनेक मंत्रीपदेही भूषवली. मात्र शिवसेनेत असलेला त्यांचा दरारा काही राष्ट्रवादीमध्ये दिसला नाही. आता तर महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळ तुरुंगात आहेत.


नारायण राणे -

जुलै 2005 मध्ये शिवसेनेला आणि बाळासाहेबांना हादरवून सोडणारे आणखी एक बंड झाले. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर तोफ डागल्यावर त्यांना शिवसेना सोडावी लागली. राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली, तेव्हा त्यांनी थेट शिवसेनेला अंगावर घेत सामना कार्यालयासमोर आपली पहिली सभा घेतली.



त्यांनतर कोकणात शिवसेना वाढू देणार नाही असा विडाच त्यांनी उचलला. पोट निवडणुकीत शिवसेना उमेदवार परशुराम उपरकर यांचे डिपॉझिट जप्त करत राणेंनी ती निवडणूक जिंकली. त्यानंतर खासदारकी असो वा जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये राणेंनी काँग्रेसचा झेंडा सिंधुदूर्ग जिल्ह्यात फडवकला. मात्र 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश राणे यांचा पराभव तर विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या वांद्रे पोट निवडणुकीत राणेंना धूळ चारत शिवसेनेने सगळा हिशोब चुकता केला.

आता तर राणे काँग्रेसमध्ये नाराज असून, ते लवकरच भाजपावासी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाकडूनही राणेंना सिग्नल मिळत नसल्याने आणि काँग्रेसनेही राणेंना महत्व न देण्याचे धोरण आखल्यामुळे राणेंची अवस्था सध्या 'ना घर का, ना घाट का' अशीच झाली आहे.


राज ठाकरे -

2005 मध्ये नारायण राणे यांच्या बंडाची झळ शिवसेनेला बसत असतानाच जानेवारी 2006 मध्ये खुद्द ठाकरे कुटुंबात ठिणगी पडली. राज ठाकरे यांनी उद्धव व त्यांच्या आसपासच्या मंडळींवर हल्लाबोल करत शिवसेना सोडली आणि बाळासाहेबांना एक मोठा धक्का बसला. शिवसेनेला आव्हान देणारा आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा 'मनसे' हा पक्ष उदयास आला.



मनसेची स्थापना झाली तेव्हा मनसे भोवती राज ठाकरे नावाचे वलय होते. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत 13 आमदारांसह मनसेचा महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि देशाच्या राजकारणात चंचुप्रवेश झाला. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीतही मनसेचे इंजिन सुसाट होते. नाशिक महापालिकेवर तर महापौर मनसेचाच होता. वाटले होते कि मनसे आता महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देईल.

मराठीच्या मुद्द्याला मनसेने हात घातला आणि मराठी मनाने मनसेला डोक्यावर घेतले. त्याचा फटका शिवसेनेला बसला. पण शिवसेना त्यातून सावरली. उठून उभी राहिली. याचाच परिणाम की काय कालांतराने मनसेला उतरती कळा लागली. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. नुकत्याच झालेल्या मुंबई, नाशिक, कल्याण डोंबिवली, तसेच इतर महापालिका निवडणुकीत तर राज ठाकरेंच्या इंजिनाला जणूकाही ब्रेकच लागला. आता जवळपास यार्डातच असलेले हे इंजिन चमत्कार करून फिनिक्स पक्ष्यासारखे पुन्हा भरारी घेते का? हे येणारा काळच ठरवेल.


गणेश नाईक -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक हे देखील पहिल्या फळीतले नेते होते. मात्र त्यांची देखील सध्या अवस्था अत्यंत वाईट आहे. गणेश नाईक यांनी युतीचे सरकार सत्तेमध्ये असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सनेला रामराम केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला.



त्यानंतर 2004 ते 2014 पर्यत त्यांच्या प्रवास चढता राहिला खरा; पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या साम्राज्याला हादरा देण्यात शिवसेनेला पुन्हा यश मिळाले. गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा लोकसभेत दणदणीत पराभव करत सेनेच्या राजन विचारे यांनी ठाण्याच्या गडावर भगवा फडकवला. तर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा