Advertisement

महाअाघाडीत मनसेला घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव; काँग्रेसचा विरोध


महाअाघाडीत मनसेला घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव; काँग्रेसचा विरोध
SHARES

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. भाजप सरकारला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) महाअाघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्ताव ठेवला अाहे. मात्र, मनसेला घेण्यास काँग्रेसने तीव्र विरोध केला अाहे. राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर मुंबईत काँग्रेसचं मोठं नुकसान होईल. उत्तर भारतीय मतदार नाराज होतील, असं म्हणत काँग्रेसनं हा प्रस्ताव नाकारल्याचं बोललं जात अाहे.


पवार - ठाकरे जवळीक

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आगामी निवडणुकीचे वेध लागले असून मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी राज्यात महाआघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यात समविचारी पक्षांना एकत्र घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली अाहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली. आतापर्यंत मनसे-राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या चर्चा होत होत्या.  मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चांना दुजोरा दिला आहे.


संजय निरुपम यांचा विरोध

काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला युतीत सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. मनसेला सोबत घेण्याची विनंती केली अाहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकीत मनसेला सोबत घ्यायला हवं. शहरी भागात मनसेची पकड मजबूत आहे. त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो, असं राष्ट्रवादीकडून ठेवण्यात आलेल्या  प्रस्तावात म्हटल्याचं समजतं.  या प्रस्तावाला काँग्रेसच्या संजय निरुपम आणि इतर काही नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे.


उत्तर भारतीय नाराज होतील

उत्तर भारतीय मतदार  राज ठाकरे यांच्या पक्षाला मदत करतील का हा प्रश्न अनुत्तरित आहे. उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत हे मतदार भाजपसोबत गेले होते. यावेळी ते पुन्हा काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. अशावेळी राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर उत्तर भारतीय मतदार पुन्हा नाराज होतील आणि याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो. त्यामुळे मनसेला सोबत घेणं महागात पडू शकतं. याच कारणामुळे महाआघाडीत मनसेचा समावेश होणार की नाही हा येणारा काळ ठरवेल. पण तूर्तास मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात युती पहायला मिळाली तर वावगं ठरू नये.



हेही वाचा -

मुनाफ हकीम यांचा राष्ट्रवादीला रामराम



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा