मुनाफ हकीम यांचा राष्ट्रवादीला रामराम


SHARE

राफेल विमान खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील त्यांचे समर्थक व राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी शुक्रवारी पक्षाला रामराम ठोकला.

धक्का बसला

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र पाठविलं. शुक्रवारी सकाळी बिहारमधील राष्ट्रवादीचे खासदार तारीक अन्वर यांनी पक्षाचा तसेच खासदारकीचा राजीनामा दिला होता. राजीनामा पत्रात मुनाफ हकीम म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून १९९९ पासून आपण राष्ट्रवादीत कार्यरत होतो. तेव्हापासून शरद पवार यांची प्रतीमा धर्मनिरपेक्ष होती. राफेल खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी चारही बाजूने अडचणीत आले असताना त्यांच्या बाजूने मत व्यक्त केल्याने आम्हाला धक्का बसला आहे. त्यामुळे अन्वर यांनी राजीनामा दिल्याने आम्ही पक्षात राहू शकत नाही. पवार यांना असं वक्तव्य करण्यास कोणी भाग पाडलं, याचा विचार व्हायला हवा, असंही ते म्हणाले.

अनेक कार्यकर्ते बाहेर पडतील

राष्ट्रवादीत आपला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क राहिला आहे. आपल्या पाठोपाठ अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडतील, असा इशाराही मुनाफ हकीम यांनी या पत्रात दिला आहे. आता आपण पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही. मात्र, धर्मनिरपेक्ष शक्तींबरोबर आपण उभं राहू, असंही हकीम म्हणाले.हेही वाचा-

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाअाड जातील - मुख्यमंत्री फडणवीस 
संबंधित विषय
ताज्या बातम्या