Advertisement

किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा- राष्ट्रवादी काँग्रेस

भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावं परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल.

किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा- राष्ट्रवादी काँग्रेस
SHARES

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, परंतु दुर्दैवाने तोही धंदा चालणार नाही. कारण त्यांची भविष्यवाणी फोल ठरते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. 

अल जेब्रिया कोर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आरोप केला आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा काडीमात्रही संबंध नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे, असंही महेश तपासे म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावं परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. उगीचच नेत्यांना बदनाम करण्याचं कट-कारस्थान ताबडतोब थांबवावं, असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.

हेही वाचा- लहान मुलांनाही ऑक्टोबरपासून मिळणार कोरोना लस

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याचा दावा केला होता. त्यावर अर्शद सिद्दीकी यांनी खुलासा केला आहे. अर्शद सिद्दीकी हे मेसर्स असलिना अॅग्रो अँड हॉर्टिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीसंबंधी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने 'अल-जेब्रीया कोर्ट' ही इमारत जप्त केली. परंतु जप्ती आदेशात कुठेही छगन भुजबळ किंवा त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचं नाव नसल्याचे सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.  

'ही इमारत शेख जबार अब्दुल्लाह अल-सबाह यांच्या मालकीची होती. २४ डिसेंबर, २०१३ रोजी शेख जबार व मेसर्स असलिना अॅग्रो अँड हॉर्टिकल्चर प्रा. लिमिटेड यांच्यात झालेल्या करारानुसार ती मेसर्स असलिना अॅग्रो अँड हॉर्टिकल्चर प्रा. लिमिटेडने खरेदी केली. त्यानुसार सध्या ही इमारत अर्शद सिद्दीकी व कंपनीत संचालक असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, असं सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा