Advertisement

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करणार कोरोना रुग्णाला प्लाझ्मा दान

कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाबाधित रुग्णाला आपला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करणार कोरोना रुग्णाला प्लाझ्मा दान
SHARES

कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाबाधित रुग्णाला आपला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली. (ncp leader and maharashtra housing minister jitendra awhad will donate his plasma to covid 19 patient)

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, मतदार संघात लोकसेवा करत असताना मला अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी हाॅस्पीटलमध्ये जावून प्लाझ्मा डोनेट करणार आहे.

‘असा’ झाला कोरोना

लाॅकडाऊनमुळे (lockdown) अडचणीत आलेल्या कळवा-मुंब्रा परिसरातील रहिवाशांसाठी आव्हाड यांच्यामार्फत ‘कम्युनिटी किचन’ चालवण्यात येत होतं. तसंच त्यांना दैनंदिन उपयोगाच्या जीवनावश्यक वस्तू, धान्य देखील वाटण्यात येत होतं. त्यातच आव्हाड यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ताफ्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होताच आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना चाचण्या (corona test) केल्या होत्या. तर खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड यांनी स्वत:चं विलगीकरण करून घेतलं होतं. 

हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात, ठणठणीत बरे होऊन परतले घरी

परंतु प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करण्यात आले. पुढील काही दिवस कोरोनावर उपचार घेऊन आव्हाड ठणठणीत बरे झाले. तसंच काही दिवसांनी पुन्हा एकदा कामात सक्रीय देखील झाले. 

'या' नेत्यांनाही लागण

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजपचे खासदार कपिल पाटील, अशा काही मोठ्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं औषध किंवा लस अद्याप तयार न झाल्याने विविध प्रकारे प्रयोग करून रुग्णांवर उपचार करून पाहिले जात आहेत. त्यातच प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे.

इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या वापरला मंजुरी दिली आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ॲण्टीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात सोडला जातो. यातून संबंधित व्यक्तीच्या शरीरातही कोरोनाला प्रतिकार करणारे ॲण्टीबॉडीज तयार होऊ लागतात, असा तज्ज्ञांचा दावा आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा