Advertisement

राणेंचा एक्सक्लुझिव्ह 'चिवडा'!


राणेंचा एक्सक्लुझिव्ह 'चिवडा'!
SHARES

मुंबई - या मोसमात कोकणातील लोकं भेट म्हणून शक्यतो आंबे देतात. कोकणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील दरवर्षी आपल्या जवळच्या नेत्यांना आंब्याच्या पेट्या देतात हे सर्वश्रुत आहेच. मात्र यंदा नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र आणि काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी आंब्यांऐवजी चिवडा वाटलाय. तोही फक्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच. खरं वाटत नाही ना? निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘प्रती अशोक चव्हाण, चिवडा पाठवत आहे. पदं तुम्ही वाटू शकत नाही, किमान चिवडा वाटप करा, काँग्रेस कार्यकर्ता निलेश राणे' असं लिहून त्यांनी चिवडा भरलेल्या बॉक्सचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.


बॉक्स भरुन पाठवला आहे!! pic.twitter.com/6eyEuK1Ali

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 5, 2017



निलेश राणे यांनी अशोक चव्हाण यांना नेमका हा चिवडा भरलेला बॉक्स पाठवलाय तरी का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याच कारण आहे रत्नागिरी जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष न दिल्याचे. अनेकदा पत्र व्यवहार करूनही अशोक चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हयाला जिल्हाध्यक्ष न दिल्याने निलेश राणे नाराज झाले. याच नाराजीतून त्यांनी नुकताच आपल्या सरचिटणीस पदाचा देखील राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी यावेळी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. निलेश राणे यांनीच नाही तर नारायण राणे यांनी देखील अशोक चव्हाण यांच्याविरोधात नाराजीचा सूर आळवला होता. त्यामुळे नारायण राणे भाजपाच्या वाटेवर आहेत की काय? अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या.

त्यातच आता निलेश राणे यांनी प्रदेश कार्यालयात थेट चिवडा पाठवून अशोक चव्हाण यांना डिवचलं आहे. तसेच एवढ्यावरच थांबणार नाही तर कार्यकर्त्यांसाठी माझा कायम लढा सुरू राहणार असल्याचेही निलेश राणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राणे विरूद्ध अशोक चव्हाण हा वाद पुन्हा रंगणार यात शंका नाही. तूर्तास तरी अशोक चव्हाण यांच्यापर्यंत आंब्याच्या पेटीऐवजी निलेश राणे यांनी पाठवलेला चिवडा पोहोचलाय हेही तितकंच खरं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा