'शिक्षण समितीला अधिकारच नाहीत'

  मुंबई  -  

  दादर - पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे हे मान्य करत ही गळती थांबणे गरजेचे असल्याचं मत शिवसेनेचे युवानेते समाधान सरवणकर यांनी मांडले. 'मुंबई लाइव्ह'च्या 'मुंबई नाका' या विशेष कार्यक्रमात शिक्षण या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी भाजपाचे पालिकेतील शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे, काँग्रेसचे पालिकेतील शिक्षण समिती सदस्य विजय कांबळी, शिक्षण तज्ञ्ज मनोहर शिंपी, कलाकार प्रमोद पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडिलू यांनी आपले विचार मांडले.

  पालिकेतील शिक्षण समितीचे अधिकार हिरावून घेतल्याने शिक्षण समितीत उदासिनता असल्याचे सांगत शिवसेनेने वाटलेले टॅब हे शिक्षण समितीला विचारात न घेता वाटल्याचा आरोप शिवनाथ दराडे यांनी यावेळी केला. तसेच मुंबई महानगर पालिकेकडे ६० शाळांना अनुदान देण्याएवढे पैसे नाहीत का? असा सवाल करत शिवसेनेवर घणाघात केला. तर शिक्षण तज्ञ्ज मनोहर शिंपी यांनी शिक्षकांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत मराठी शाळांचा, विशेषत: पालिका शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, असं सांगितलं. तर शिक्षकांना योग्य अनुदान मिळत नसल्याने शिक्षक लक्ष देत नसल्याचं म्हणत विजय कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.

  भटक्या समाजातील मुलं आजही शिक्षणापासून वंचित असल्याचे सांगत या सामाजाला शिक्षण मिळाले तर जात पंचायतीसारख्या अनेक प्रथा बंद होतील असं मत सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडिलू यांनी मांडलं. तसेच पूर्वीसारखे शिक्षक आता उरले नाहीत असं सांगत मराठी भाषा ऐकणारे उरले नाहीत तर आपण बोलायचं कसं असा सवाल अभिनेते प्रमोद पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान यावेळी विश्वनाथ दराडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिक्षण समितीच्या २६ सदस्यांचे अधिकार हिरावून घेतल्याने हे सदस्य गैरहजर राहत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टॅबमधील अभ्यासक्रम शिक्षण तज्ञ्जांना का दाखवला नाही? असा रोखठोक सवालही त्यांनी उपस्थित केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.