Advertisement

चाणाक्ष राजकारण्याचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास

बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय होणार? अशी शंका उपस्थित करणाऱ्या राजकीय विश्लेषकांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय खेळीने चोख उत्तर तर दिलंच. परंतु अचूक टायमिंग साधून शिवसेनेला महाराष्ट्रातील सत्तेच्या अग्रस्थानी देखील नेऊन बसवलं.

चाणाक्ष राजकारण्याचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास
SHARES

राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नसतो. दोन पक्के वैरी क्षणाधार्थ मित्र होतात, तर कट्टर विरोधक एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. याच न्यायाने मागील पन्नास ते साठ दशकांत महाराष्ट्रातील राजकीय पटलावर दबदबा निर्माण करूनही सत्तापद न उपभोगणाऱ्या ठाकरे कुटुंबातील व्यक्ती थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते. ही तशी न पटणारी पण तेवढीच आश्चर्याचा धक्का देणारी घटना बरोबर वर्षभरापूर्वी घडली. महाविकास आघाडीच्या रुपाने एकमेकांचे तगडे विरोधक शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि या सरकारचे मुख्यमंत्री बनले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray). 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचं काय होणार? अशी शंका उपस्थित करणाऱ्या राजकीय विश्लेषकांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय खेळीने चोख उत्तर तर दिलंच. परंतु अचूक टायमिंग साधून शिवसेनेला महाराष्ट्रातील सत्तेच्या अग्रस्थानी देखील नेऊन बसवलं. कधीकाळी महाराष्ट्रातील राजकारणाची समज नसलेला नेता अशी हेटाळणी सहन करावी लागलेल्या उद्धव ठाकरे यांची केवळ राज्यच नव्हे, तर देशातील चाणाक्ष नेता अशी नवी ओळख आजघडीला निर्माण झाली आहे. फोटोग्राफर ते मुख्यमंत्री अशी त्यांच्या विलक्षण कारकिर्दीवर एक नजर टाकूया:   

कलात्मक नजर 

राजकारणात येण्याआधी उद्धव ठाकरे हे व्यावसायिक फोटोग्राफर होते. देशातील नामवंत फोटोग्राफर्समध्ये त्यांचं नाव घेतलं जायचं. राजकारणात आल्यावरही त्यांनी फोटोग्राफीची आवड जपली होती. परंतु सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना फोटोग्राफीला वेळ देणं कठीण झालं आहे. ‘महाराष्ट्र देशा’, ‘पहावा विठ्ठल’ या दोन नावाजलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वारशाचं विलोभनीय दर्शन अख्ख्या जगाला घडवलं. ते त्याच्याकडे असलेल्या कलात्मक नजरेच्या माध्यमातून. त्याशिवाय त्यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाने त्यांच्यावर वेळोवेळी कौतुकाचा वर्षाव देखील झालेला आहे.   

राजकारणात प्रवेश

उद्धव ठाकरे राजकीय कार्यक्रमांत अधूनमधून दिसत असले, स्थानिक राजकारणात थोडफार लक्ष (२००२ महापालिका निवडणुकीची जबाबदारी) घालत असले, तरी २००३ पर्यंत सक्रीय राजकारणापासून ते दूरच होते. परंतु शिवसेनेचं (shiv sena) महाबळेश्वर इथं झालेलं अधिवेशन उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारं ठरलं. या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष पदी निवड केली. आतापर्यंत केवळ शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते अशी पदविभागणी असलेल्या शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष हे पद तयार झालं. घराणेशाहीला विरोध असलेल्या बाळासाहेबांनी या निवडीवर नेते-पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्न उपस्थित केले. परंतु या निर्णयावर सर्वचजण ठाम राहिल्याने उद्धव ठाकरे यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला. 

कसोटीचा काट

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून पक्षातील गटातटाच्या राजकारणाने टोक गाठलं. बाळासाहेबांच्या जुन्या-जाणत्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असला, तरी नारायण राणे, राज ठाकरे (raj thackeray) आणि स्मिता ठाकरे अशा शिवसेनेत आधीपासूनच दबदबा असलेल्या नेत्यांची महत्त्वाकांक्षाही याच काळात उसळी मारू लागली. निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप, गटबाजी, वाद-विसंवाद, अशा एक ना अनेक कारणांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडून अखेर २००५ साली नारायण राणेंनी काँग्रेसची वाट धरली, तर त्याच्याच काही महिन्यांनी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. या सगळ्या प्रसंगात उद्धव ठाकरे यांनी संयम ढळू न देता, शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून आपलं स्थान हळुहळू भक्कम केलं.  


पक्षविस्तार

राज ठाकरे यांचा करिष्मा आणि त्यातुलनेत उद्धव ठाकरे यांचं सोज्वळ व्यक्तीमत्त्व याची सुरूवातीच्या टप्प्यात खूपच तुलना झाली. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या झंझावाती भूमिकेची झळ शिवसेनेला मोठ्या प्रमाणात बसली. पण त्यातून धडा घेत केवळ मराठी मतदारांवरच अवलंबून न राहता गुजराती, हिंदी भाषिक मतदारांनाही आकर्षित करून घेण्याची कल्पना उद्धव ठाकरे यांनी राबवली. ‘मी मुंबईकर’ हे कॅम्पेन त्यापैकीच एक. छटपूजेत शिवसेना नेत्यांची उपस्थिती असो किंवा गुजरातीबहुल भागातील होर्डिंग असो, शिवसेनेची ‘कट्टर’ भूमिका सर्वसमावेशक करण्याचं श्रेय उद्धव ठाकरे यांनाच जातं. एवढंच नव्हे, तर हिंदुत्व, काश्मीर-पाकिस्तान आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर वेळोवेळी भूमिका घेऊन, महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवत पक्षविस्ताराचं धाडस देखील उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं. 

चाणाक्ष राजकारणी 

काळाच्या ओघात छोटा भाऊ मोठा झाला. भाजप (bjp) नेतृत्वाच्या दबावात ५ वर्षे काढावी लागली. कधी मोर्चे काढून तर कधी खिशात राजीनामे ठेवून भाजपला नामोहरम करण्याचे असंख्य प्रयत्न झाले, परंतु सत्तेच्या सारीपाटाबाहेर शिवसेनेने पाऊल टाकलं नाही. कधी युती तोडून, तर कधी जुळवून घेत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत चालाखीने शिवसेनेला सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. २०१९ साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांनी सर्वच राजकीय विश्लेषकांचे, नेत्यांचेच नाही तर शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपाचे आजवरचे सर्व आडाखे चुकवले. 


महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या युतीला बहुमत मिळालं खरं, परंतु शिवसेना जागांच्या बाबतीत पिछाडीवर राहिली. मंत्रीपद असूनही उपभोगायला न मिळणं याचा पुरेपूर अनुभव शिवसेनेने मागील सत्तेत घेतला होता. त्यात पुन्हा सत्तापदांवरून खेचाखेची सुरू झाली. शिवसेनेचे नेते भाजपवर तुटून पडले, योग्य रणनितीच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी स्व:ला चिखलफेकीपासून अलिप्त ठेवलं, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणीही यशस्वी केली. 

अखेर कधीकाळी एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रावादीने (shiv sena, congress and ncp) एकमेकांशी जुळवून घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचं काय होईल? यापुढं कधी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? या प्रश्नाची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून अत्यंत सक्षमपणे दिली. मुख्यमंत्रीपद स्वीकारताच कोविडचं उद्धवलेलं संकट, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि तिघाडी सरकारचा तोल सांभाळत विरोधक भाजपच्या हल्ल्यांना परतवून लावण्याची मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. 

हे तीन चाकी सरकार कुठल्याही क्षणी कोसळेल, असं दरदिवशी भाकीत करणाऱ्या भाजप नेत्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांनी हे सरकार वर्षभर अत्यंत खडतर परिस्थितीत चालवून दाखवलं आहे. सुरूवातीच्या टप्प्यात जनतेकडूनही उद्धव ठाकरे यांना पुरेसा पाठिंबा आणि सहानुभूती मिळाली. परंतु या कठीण परिस्थितीतून महाराष्ट्राला बाहेर काढत आपल्या स्वभावानुसार राज्याच्या राजकारणात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करायचं असेल, तर उद्धव ठाकरे यांना आपली सारी शक्ती पणाला लावावी लागेल.  


Read this story in English
संबंधित विषय