Advertisement

ग्लोबल टेंडरच्या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचं काम, प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर आरोप

जनतेला दाखवण्याकरता ग्लोबल टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

ग्लोबल टेंडरच्या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचं काम, प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर आरोप
SHARES

महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागत आहे आणि त्याचवेळी महापालिकेला (bmc) स्वतः मंजुरी देतंय ? यांचं गौडबंगाल काही कळत नाही! जनतेला दाखवण्याकरता ग्लोबल टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ?, असा सवाल भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारवर टीका करताना प्रविण दरेकर म्हणाले की, राज्य सरकार लसीकरणाच्या आपल्या जबाबदारीपासून दूर जाताना दिसत आहे. कारण १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण राज्य सरकार करणार. लस विकत घेण्यासाठी चेक हातात तयार आहे, एकरकमी पैसे देणार. महाराष्ट्रातील लसीकरण पूर्णपणे मोफत करणार, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने घेतली आहे. 

परंतु पुन्हा ही जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलण्याचं काम राज्य सरकार करत आहे. लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याच्या परवानगीकरीता राज्य सरकार पत्र लिहिणार आहे. एकिकडे आठवड्याभरापासून ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू केली, निविदा मागवल्या असं बोलत आहेत आणि आता पुन्हा केंद्राला पत्र लिहिणार. म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचं काम हे सरकार करताना दिसत आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.

हेही वाचा- महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्यमंत्र्यांनी केली केंद्राकडे इंजेक्शनची वाढीव मागणी

४५ वर्षांवरील लोकांचं लसीकरण केंद्र सरकार करेल आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कंपन्यांकडून ५० टक्के लसींपैकी लस खरेदी करण्याची राज्य सरकारला परवानगी असेल, एवढं स्पष्ट असताना, राज्य सरकारकडून केवळ गोंधळ निर्माण करण्याचं काम होत आहे. ४५ वर्षांवरील लोकांना दुसरा डोस देण्याची वेळ आलेली असताना आमच्याकडे केवळ १० लाख डोस आहेत, आम्हाला २० लाख डोस हवेत, अशी मागणी केंद्राकडे करत आहेत. एकप्रकारे राज्य सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहे,

आतापर्यंत आवश्यक लसी राज्य सरकारने उपलब्ध करायला पाहिजे होत्या. अजूनही ते पत्रांचे खेळ खेळत आहेत. बाकीच्या राज्यांनी लसी बुक केल्या, पैसे पाठवले, मग तुमचा चेक कुठे अडकला आहे? अजूनही आम्ही केंद्राला पत्र लिहितोय, टेंडरच्या मागे आहोत, लसी शोधतोय, एकूणच हे भांबावलेलं सरकार आहे, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

(pravin darekar slams maharashtra government on global tender for covid vaccine purchase)

हेही वाचा- वाशी, ऐरोली, नेरुळ पालिका रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारासाठी ओपीडी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा