राज्यात याआधी 'ह्या' वेळी होती राष्ट्रपती राजवट

राज्यात आता तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यापूर्वी दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

SHARE

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १९ दिवस झाल्यानंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही. त्यामुळे अखेरीस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करत राष्ट्रपती राजवट लागू केली. विशेष म्हणजे आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. 

राज्यात आता तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यापूर्वी दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राज्यात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी १९८० रोजी लावण्यात आली. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. १९७८ मध्ये पुलोद सरकार स्थापन करून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. १९८० मध्ये केंद्रात इंदिरा गांधी यांचं सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी शरद पवार यांचं सरकार बरखास्त केलं. त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी ११२ दिवस (१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

राज्यात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट पाच वर्षांपूर्वी लागू झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार राज्यात होतं. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र झाल्याने राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला. सरकारचा कालावधी संपत आल्यानं विधानसभा बरखास्त करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवस होती.  २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४  या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.
संबंधित विषय
ताज्या बातम्या