Advertisement

'गेट वे ऑफ इंडिया' की 'भारतद्वार'?


'गेट वे ऑफ इंडिया' की 'भारतद्वार'?
SHARES

मुंबई शहरातलं देशाचं प्रवेशद्वार कोणतं? या प्रश्नाचं ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे उत्तर अगदी शाळकरी विद्यार्थीही देईल. कधीकाळच्या अपोलोबंदर परिसराच्या समुद्रतटाची ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही रुढ झालेली ओळख पुसून टाकण्याचा चंग भारतीय जनता पार्टीचे आमदार राज पुरोहित यांनी बांधला आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव बदलून ते ‘भारतद्वार’ करावं, अशी मागणी पुरोहित यांनी केली आहे. यासंदर्भातलं निवेदन राज पुरोहित लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. ‘गेट वे ऑफ इंडिया’चं नाव बदलून ते ‘भारतद्वार’ करणं, देश आणि देशवासियांच्या अस्मितेचा विषय आहे, या शब्दांत राज पुरोहित यांनी ‘मुंबई लाइव्ह’जवळ आपल्या मागणीचं समर्थन केलं.

सन 1911 मध्ये, देश पारतंत्र्यात असताना इंग्लंडचे राजे किंग जॉर्ज पंचम पत्नी क्वीन मेरीसह भारतभेटीवर आले होते. ब्रिटिशांचं या देशावरचं साम्राज्य ‘याचि देहि’ पाहण्यासाठी राजा-राणीचा हा भारतदौरा होता. किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अपोलोबंदर परिसरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. ब्रिटनच्या राजा-राणीच्या भारत दौ-याचं स्मरण म्हणून अपोलोबंदर परिसरातल्या समुद्रतटावर बांधण्यात आलेल्या वास्तूचं नाव देशाचं प्रवेशद्वार अर्थात ‘गेट वे ऑफ इंडिया’ असं देण्यात आलं. 1913 ते 1924 या कालावधीत बांधकाम झालं आणि ही वास्तू उभी राहिली. अरबी समुद्राच्या भव्यतेकडे पाहणाऱ्याला आकृष्ट करणाऱ्या या वास्तूचं ब्रिटिशांनी दिलेलं नाव कायम राखणं, हे गुलामगिरीच्या मानसिकतेचं प्रतिक असल्याचा भाजपा आमदार राज पुरोहित यांचा युक्तिवाद आहे.

ब्रिटिशकालीन वास्तू, रेल्वे स्थानकांच्या नावांचं ‘भारतियीकरण’ करण्याची मागणी नवी नाही. शिवसेनेने चर्नीरोडचं गिरगाव, मुंबई सेंट्रलचं नाना शंकरशेठ, करीरोडचं लालबाग, सॅंडहर्स्ट रोडचं डोंगरी, कॉटनग्रीनचं काळाचौकी, रे रोडचं घोडपदेव अशी नवी नामकरणं करण्याची मागणी करणारं पत्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि श्रीरंग बारणे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना आधीच दिलं आहे. प्रक्रियेनुसार गृहमंत्रालयाकडून योग्य शिफारशींसह रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणं अभिप्रेत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या स्वीकृतीनंतर गृहमंत्रालयाच्या माध्यमातूनच प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जातो. तूर्त केवळ एलफिन्स्टनचं नाव बदलून प्रभादेवी करण्याला मान्यता मिळाली आहे. उरलेल्या रेल्वे स्थानकांचं नवं बारसं लवकरच होणार आहे. शहरातील काही महत्त्वाचे रस्ते, वास्तू आदींच्या नावातून निर्देशित होणाऱ्या ब्रिटिशकालीन खुणा पुसून त्याऐवजी समाजावर सकारात्मक प्रभाव सोडणाऱ्या नेत्यांची, प्रतिभावंतांची किंवा त्या त्या स्थळाचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या धर्मस्थळांची नावं दिली जावीत, अशी मागणी गेली अनेक वर्ष जोर धरून आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’चं ‘भारतद्वार’ करणं म्हणजे विदेशी सामाजिक संदर्भ झुगारून या मातीच्या गंधाला दाद देणं आहे, असा दावा राज पुरोहित यांनी केला आहे. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर लवकरच आपण ससून डॉकचं चं नाव बदलून त्याजागी स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यासाठी प्रयत्न सुरू करणार असल्याची माहिती राज पुरोहित यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

किंग पंचम जॉर्ज आणि क्वीन मेरी यांच्या भारतभेटीची आठवण आपण का जतन करून ठेवायची? ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे गुलामगिरीच्या मानसिकतेचं प्रतिक आहे, असं माझं ठाम मत आहे. माझ्या या भावना मी नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय तसंच मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त करणार आहे. हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकांना माझी मागणी म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ वाटेल. माझ्या मागणीला विरोध करणारे लोक म्हणतील, नाव बदलून काय उपयोग? अशा लोकांना मी विचारतो, नावाला महत्त्व नसेल तर ‘बॉम्बे’चं ‘मुंबई’ का केलं? भावनात्मक भाग म्हणूनच ना? ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव बदलून भारतद्वार करणं हा माझ्या दृष्टीने भावनात्मक मुद्दा आहे.
राज पुरोहित, आमदार, भाजपा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा