Advertisement

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार

तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, ११ वेळा राहिले होते आमदार
SHARES

तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh) यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रुग्णालयात मागील १५ जुलैपासून उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्यांच्यासोबत होते.

सर्वाधिक म्हणजेच तब्बल ११ वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे विक्रमवीर आमदार अशी गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. सांगोला तालुक्यात त्यांनी शेती, सहकार, पाणी, स्त्री सक्षमता यांबद्दल भरीव कामगिरी केली.

अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनानं राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा ढासळला, अशा भावना अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव देशमुख यांच्यासमोर राजकारणातील अनेक पिढ्या घडल्या आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांचं काम त्यांनी जवळून पाहिलं. एक व्यक्ती, एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ आणि ११ वेळा आमदार हे उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळच होतं.

गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. १९५० पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले.

१९६२ साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकिर्द बहरू लागली. पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.

१९७२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दोन वर्षांतच झालेल्या पोटनिवडणुकीत गणपतराव पुन्हा निवडून आले ते सलग १९९५ पर्यंत. याकाळात १९७७ साली त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभळले होते.

पुलोद काळात १९७८ साली ते पहिल्यांदा राज्यमंत्री मंडळात सहभागी झाले. त्यानंतर 1999 साली पुन्हा मंत्री झाले. याकाळात त्यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कायम लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुष्काळी सांगोल्यात टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले.

१९९५ च्या पराभवानंतर गणपतराव देशमुख १९९९ मध्ये पुन्हा निवडून आले. २०१४ पर्यंत त्यांनी ११ वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. २०१९ साली सुद्धा त्यांना निवडणूक लावण्याचा आग्रह समर्थ समर्थकांनी केला. पण ९४ वर्ष असलेले वय तसेच शरीर साथ देत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्यावर ठाम राहत आपला निर्णय बदलला नाही.


हेही वाचा

पुराचा धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू– उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा