Advertisement

शिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे.

शिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा
SHARES

निराधार, बेछूट, बेजबाबदार आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत शिवसेना (shiv sena) आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे. 

मागील गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विशेषत: शिवसेनेविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत शिवसेनेच्या अनेक आमदारांवर सोमय्या यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले. यामध्ये प्रताप सरनाईक यांचाही समावेश आहे. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर किरीट सोमय्यांनी सातत्याने टीका केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी अशी भूमिका प्रताप सरनाईकांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. मात्र, सोमय्यांनी यावर कुठलाच खुलासा न केल्याने प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

हेही वाचा- “प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय”

ईडीकडून चौकशी

एमएमआरडीएला पुरवण्यात आलेल्या टाॅप्स ग्रुप सिक्युरिटी प्रकरणात कथित गैरव्यवहार झाल्याच्या संशयामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक अंमलबजावणी संचलनालयाच्या रडारवर आहेत. या दोघांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घरासह १० ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावूनही प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात गैरहजर राहिले होते.  

त्यावर प्रतिक्रिया देताना, १०० दिवस झाले असून प्रताप सरनाईक गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचं सागितलं आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. 

कोविड काळात या मतदारसंघात हजारो लोक करोनाग्रस्त झाले असून आमदारांचा पत्ता नाही. मग आमदार कशासाठी आहेत? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर टीका केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा