Advertisement

तुमचं तुम्ही बघा, हेच पंतप्रधानांच्या भाषणाचं सार, शिवसेनेचा टोला

महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉक डाऊन हाच पर्याय असताना पंतप्रधान मोदी यांनी ‘‘लॉकडाऊन टाळा’’ असा सल्ला दिला आहे. पण हा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत?

तुमचं तुम्ही बघा, हेच पंतप्रधानांच्या भाषणाचं सार, शिवसेनेचा टोला
SHARES

कोरोनाचा सामना करणं एकट्यादुकट्याचं काम नाही. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे, असं महाराष्ट्राचे एक वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी कालच्या भाषणात त्यापेक्षा वेगळं काय सांगितलं? महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉक डाऊन हाच पर्याय असताना पंतप्रधान मोदी यांनी ‘‘लॉकडाऊन टाळा’’ असा सल्ला दिला आहे. पण हा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत? असा प्रश्न शिवसेनेने (shiv sena) पंतप्रधानांना विचारला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर अप्रत्यक्षरित्या टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच पर्याय असताना पंतप्रधान मोदी यांनी ‘‘लॉक डाऊन टाळा’’ असा सल्ला दिला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कालच्या चोवीस तासांत ६४ हजार रुग्ण एका महाराष्ट्रात झाले. मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे किमान १५ दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी करा, अशी राज्याच्या अनेक मंत्र्यांची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय तो निर्णय घेतीलच, पण ‘‘लॉकडाऊन टाळा’’ असा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत? 

महाराष्ट्रात (maharashra) दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. केंद्र सरकारनेही मागच्या आठवड्यात ‘सीबीएसई’च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून गुजरात सरकारने दोन आठवड्यांचे लॉकडाऊन लागू करावं अशी शिफारस इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कडक निर्बंध लावूनदेखील कोरोना नियंत्रणात येत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरते आहे. त्यामुळे लॉक डाऊन हीच अत्यावश्यक सेवा बनली आहे. अशा गंभीर परिस्थितीशी सामना कसा करावा याबाबत पंतप्रधान जनतेला दिलासा देतील असं वाटत होतं. 

हेही वाचा- मला हे वाचून धक्काच बसला, राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पुन्हा पत्र

कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा पोर्तुगालचा नियोजित दौरा रद्द केला हे ठीक झालं; पण त्यांनी प. बंगालातील गर्दीच्या निवडणूक सभा वेळीच आवरल्या असत्या तर कोरोनाचा संसर्ग थांबवता आला असता. प. बंगालातील प्रचारासाठी भाजपने देशभरातून लाखो लोक गोळा केले. ते कोरोनाचा संसर्ग घेऊन आपापल्या राज्यांत परतले. त्यातील अनेक जण कोरोनाने बेजार आहेत. हरिद्वारचा कुंभमेळा व प. बंगालचा राजकीय मेळा यातून देशाला फक्त कोरोनाच मिळाला. राज्यकर्त्यांनी आधी स्वतःवर निर्बंध घालून घ्यायचे असतात. इतर देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांनी असे निर्बंध स्वतःवर घालून घेतले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेला प्रवचन द्यायचा नैतिक अधिकार प्राप्त झाला आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोनाचं जणू तुफानच आहे, पण तुफानापासून बचाव कसा करायचा यावर उपाय त्यांनी सांगितला नाही. लोकांनी आपले आप्त गमावले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केलं, पण यापुढे ‘बळी’ वाढणार नाहीत याबाबत तुम्ही काय करताय? महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण राष्ट्र काय, कोरोनाची स्थिती नाजूक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असं वाटलं होतं. पण ‘‘संकट मोठं आहे, तुमचं तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचं सार आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

(shiv sena criticises pm narendra modi on speech over lockdown)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा