केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करण्यााऱ्या कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्याची परवानगी राज्यांना नुकतीच दिली आहे. त्यानुसार कंपन्यांकडून पुढील काही दिवसांत राज्यांना लस पुरवठा होईलच, परंतु पूर्वीच्या तुलनेत लशीची किंमत जास्त असेल. त्यामुळे समाजातील सधन व्यक्तींनी लस खरेदी करून ती घेतल्यास गरीब आणि गरजू व्यक्तींना सरकारकडून लस उपलब्ध करून देणं सोपं जाईल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे (rajesh tope) यांनी महाराष्ट्रातील लसीकरणाच्या कार्यक्रमावर भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, केंद्राच्या नव्या नियमावलीनुसार लस उत्पादक कंपन्यांना ५० टक्के लस केंद्र सरकार आणि उर्वरीत ५० टक्के लस राज्य सरकार तसंच खासगी रुग्णालयांना देता येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटकडे लस खरेदी करण्याबाबत विचारणा केली असता केंद्र सरकारच्या लशींचे डोस २४ मे पर्यंत बुक असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच सीरमकडून आपल्याला पुढील महिनाभर तरी लस खरेदी करता येणार नाही.
हेही वाचा- मला हे वाचून धक्काच बसला, राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पुन्हा पत्र
सीरमने कोविशील्ड लशीचे नवे दर जाहीर केले असून त्यानुसार केंद्र सरकारला प्रति डोस १५० रुपये, राज्य सरकारला ४०० रुपये, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने लस उपलब्ध करून देण्यात येईल. भारत बायोटेकने अजून आपले नवे दर जाहीर केलेले नाहीत. त्यांनी दर जाहीर केल्यानंतरच त्यानुसार निर्णय घेता येईल.
त्याचबरोबर केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीत काही परदेशी लशींना देखील मान्यता दिलेली आहे. त्यांचा देशात पुरवठा सुरू झाल्यास लशीची तूट कमी होईल. मात्र भारतीय लशीच्या तुलनेत परदेशी लशींची किंमत सातपट ते दहापट अधिक आहे. परदेशी कंपन्यांनी या लशींची किंमत कमी करण्याची तयारी दाखवल्यास, राज्य सरकार त्यावर ताबडतोब निर्णय घेईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिक देखील कोरोनावरील लस घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे लशीच्या मागणीत आता मोठी वाढ अपेक्षित आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत लशींचा तुटवडा बघता जर सधन वर्गाने लस खरेदी करून ती घेतल्यास गरीब आणि गरजू व्यक्तींना सरकारकडून लस उपलब्ध करून देणं सोपं जाईल. लस कोणत्या घटकांना मोफत द्यायची यावर निर्णय घेतला जाईल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
(maharashtra health minister rajesh tope explains covid 19 vaccination programme in state)