राज्य सरकार घेणार वादग्रस्त ऑगस्ता वेस्टलँड कंपनीची हेलिकॉप्टर्स भाड्याने

  Mantralaya
  राज्य सरकार घेणार वादग्रस्त ऑगस्ता वेस्टलँड कंपनीची हेलिकॉप्टर्स भाड्याने
  मुंबई  -  

  अती महत्वाच्या व्यक्तींसाठी आता राज्य सरकारने विमानं आणि हेलिकॉप्टर घेण्यासाठी दोन एजन्सीची नियुक्ती केली आहे. याआधी अति महत्त्वाच्या व्यक्तींना विमान चालन संचालनालयाद्वारे विमान आणि हेलिकॉप्टर सुविधा पुरवली जायची. मात्र आता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीने निर्णय घेतला आहे.

  विशेष म्हणजे राज्य सरकारने निवडलेल्या या 9 हेलिकॉप्टरर्समध्ये वादग्रस्त ऑगस्ता वेस्टलँड कंपनीच्या ऑगस्ता ग्रँड, ऑगस्ता 109 पी, ऑगस्ता 109 ई या हेलिकॉप्टरर्सचाही समावेश आहे. भारतात व्हीव्हीआयपींसाठी विमाने खरेदी केली जावी यासाठी वायुसेनेचे माजी प्रमुख एस.पी. त्यागी यांना लाच दिल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांना अटकही झाली होती.

  यूपीएच्या काळात भाजपाने ऑगस्ता वेस्टलँड कंपनीच्या 3767 कोटींच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर कराराला विरोध केला होता. यामध्ये काहींना लाच देखील देण्यात आल्याचा आरोप झाला होता. राज्य सरकारने मे. अँडोनीस एव्हीएशन इंटरप्रायझेस आणि मे. अँलॉफ्ट एव्हीएशन या दोन कंपन्यांना ई टेंडरद्वारे विमान आणि हेलिकॉप्टर पुरविण्याचे काम दिले आहे. हवाई सेवेचे दर निश्चित करण्याचे निर्णयही याच दोन कंपन्यांना देण्यात आले आहेत. या दोन्ही कंपन्यांसोबत 31 डिसेंबर 2018 पर्यंत करार असणार आहे. 

  कित्येक वेळा शासकीय विमाने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेतं. या विमानांसाठी राज्य सरकारला तासाला पैसे मोजावे लागणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ते 20 व्यक्ती बसू शकतील अशी छोटी विमाने आणि हेलिकॉप्टरर्सला राज्य सरकारला तासाला दीड लाख ते 4 लाख 60 हजार रुपये मोजावे लागतील. राज्य सरकारने 22 विमाने आणि 9 हेलिकॉप्टरर्स निवडली आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.