Advertisement

Women's Day : महिना केवळ 1650 रुपये मानधन, 'आशा' वर्कर्सची होतेय निराशा

कौतुकाची थाप नको, हवा हक्काचे मानधन... जास्त काम, कमी पगार, आशा वर्कर्सचे खच्चिकरण... महिला दिनी जाणून घ्या या आशा वर्कर्सच्या समस्या...

Women's Day : महिना केवळ 1650 रुपये मानधन, 'आशा' वर्कर्सची होतेय निराशा
Representative Image
SHARES

सुख में सब हैं, दुख में मितानीं. म्हणजेच आनंदाच्या वेळी प्रत्येकजण असतो, परंतु दुःखात फक्त मितानीच असतात. मितानी या शब्दाचा अनुवाद 'मित्र' असा होतो. एक मैत्रिपूर्ण असा आशा वर्कर्सचा सर्व सामान्य जनतेशी येणारा संबंध. सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका बजावण्यासाठी या आशा वर्कर्सना नियुक्त केले गेले.

नियुक्त केल्यापासून आशा वर्कर्सच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं गेलंय. पण फक्त कौतुकाने पोट भरत नाही, हे सांगताना आशा वर्कर्सना गहिवरून येते. कोरोना काळातच नाही तर इतर वेळाही सर्वांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या या आशा वर्कर्स मात्र आजही अनेक अ़चणींचा सामना करत आहेत. देशातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्याच आज स्वत:च्या हक्कांसाठी लढत आहेत.

कोव्हीड-19च्या काळात केलेल्या कामाची दखल WHO ने घेतली, पण आमच्याच सरकारने अद्याप आमची काहीच दखल घेऊ वाटली नाही, हे खेदजनक असल्याचे आशा वर्कर्सचे म्हणणे आहे.

सध्याच्या घडीला या आशा वर्कर्सना केंद्र शासनाकडून 1650 रुपयांचे मानधन दिले जाते. तर राज्य शासनाकडून 5500 हजार मानधन देणे ठरले आहे. पण केवळ महिन्याला 1650 रुपये त्यांच्या हाती येतात. राज्य सरकारकडून येणारे 5500 रुपये तीन महिन्याने दिले जातात. पण ते सुद्धा पूर्ण दिले जात नाहीत. केवळ 10 ते 11 हजार रुपये तीन महिन्यांनी आशा वर्कर्सच्या हाती येतात.

गेल्या काही वर्षांमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. पण आमचा पगार मात्र आहे तेवढाच आहे. इतक्या तुटपुंज्या पैशात घरं कसं चालवायचं? हा प्रश्न कायम आशा वर्कर्सना  पडतो, असे स्वाती कांबळे सांगतात. स्वाती कांबळे या कांजुर भागात आशा वर्कर्स म्हणून काम पाहतात. गेली अनेक वर्ष ते आशा वर्कर्सचं कर्तव्य पार पाडत आहेत. 

गेली अनेक वर्ष मी आशा सेविका म्हणून काम करतेय. पण जी परिस्थिती तेव्हा तशीच आमची दुरवस्था आजही आहे. इतक्या वर्षांमध्ये सरकार बदलली पण आमची परिस्थिती काही बदलली नाही. तेव्हा देखील आम्ही कमी मानधनात काम करत होतो आणि आजही करतोय. रोज इतके तास काम केल्यानंतर घरचेही विचारतात तू काम करतेस मग पैसे का नाही मिळत? अशा परिस्थितीतही आम्ही या लोकसेवेत जीव ओतून काम करतो"

- स्वाती कांबळे, आशा वर्कर, मुंबई

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरातील डॉक्टर सज्ज होते. आशा वर्कर्सही पदर खोचून कामाला लागल्या होत्या. शहर असो की गाव, घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची माहिती गोळा करण्याचं काम आशा वर्कर्सनी केलं. फक्त कोरोना काळातच नाही तर इतर रुग्ण जसे की, टीबी पेशंट्स सांभाळताना आशा वर्कर्सच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत.  

"कोरोना काळात इतकं काम करूनही आमच्या आरोग्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केलं. कोरोना काळात काय ते मास्क दिले जात होते. पण आता कोरोनानंतर आम्हाला मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज मागावे लागत आहेत. तगादा लावला तर आम्हाला आवश्यक गोष्टी मिळतात. नाहीच तर आम्ही आमच्या पैशाने मास्क, ग्लोव्हज विकत घेतो. कारण आमचं सुद्धा कुटुंब आहे. घरी गेल्यावर त्यांना कुठलं इनफेक्शन होऊ नये, हे देखील आम्हाला बघावे लागते. त्यामुळे सरकार घेत नसली तरी स्वत:ची काळजी आम्ही घेतोच पण इतरांची काळजीही आम्ही घेतो," अशा भावना स्वाती कांबळे यांनी व्यक्त केल्या. 

स्वाती कांबळे यांच्या सारख्याच अनेक आशा वर्कर्स आज वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात आहेत. त्यापैकीच एक आहेत तुलसनकर आहेत. 

मलेरिया, चिकन गुनिया, टीबी अशा सर्व रुग्णांना आम्ही हाताळतो. सर्व सर्व्हे आम्ही करतो. पण हे सगळं करून सुद्धा आम्हाला पोट भरेल इतके मानधनही मिळत नाही. मानधन वाढीसाठी संघर्ष करून तुटपुंजी का होईना पण वाढ करून घेतली. पण ती देखील आम्हाला पूर्ण अशी मिळत नाही.  

- आशा तुलसनकर, आशा वर्कर्स, मुंबई 

"आशा हा कामावर आधारीत मोबदला आहे. म्हणजे जेवढे काम असणार तेवढा मोबदला मिळणार. पण आता तो मोबदला पण आम्हाला ऑक्टोबरपासून बंद केला आहे. जसं आता गरोदर माता असतात त्यांचा 9 महिन्यापर्यंत फॉलोअप घेणे, तिला गोळ्या औषधे पुरवणे. बिपी वैगरे चेक करणे, ब्लड शुगर तपासणे या सगळ्या गोष्टींचे आम्हाला 300 रुपये दिले जायचे. त्यात 100 रुपये कपात करून 200 रुपये दिले जायचे. तेही ऑक्टबरपासून बंद केले गेले आहेत," अशी माहिती आशा तुलसनकर यांनी दिली. 

तुलसनकर या पुढे म्हणाल्या की, "डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला आता ऑनलाईन काम करायला सांगतात. पण आमच्याकडे साधे सरकारने दिलेले मोबाईल नाहीत. आम्ही स्वत:चे मोबाईल वापरतो. कधीकधी नवऱ्याचे फोन वापरतो. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे केंद्राकडून आम्हाला केवळ 100 रुपयांचा रिचार्ज मिळतो. या 100 रुपयात आम्ही ऑनलाईन कामं कशी करायची? मानधनही कमी आहे की आम्ही ते रिचार्ज करायला वापरू की  घर चालवू? हा प्रश्न पडतो." 

महाराष्ट्रात सध्या 70 हजाराच्या आसपास आशा वर्कर्स कार्यरत आहेत. तर मुंबईत 600 ते 700 आहेत. तर पालिकेच्या आशा वर्कर्सही आता मुंबईकरांच्या सेवेत आहेत.

आशा वर्कर्सनी गेल्या अनेक वर्षात बऱ्याचदा संप केला. पण त्यांना आश्वासनांशिवाय काहीच हाती लागलं नाही. नुसती आश्वासनं देतात पण GR काढला जात नाही, असा आरोप बऱ्याच आशा वर्कर्सनी केला. शिवाय संपावर असताना देखील आमची अवस्था वाईटच होती. जेवायची व्यवस्था नाही, बाथरूमची सोय नाही. त्यामुळे संप करायचा म्हटलं तरी आमचे प्रचंड हाल असतात, अशा भावना आशा वर्कर्सनी व्यक्त केल्या.  

काही आशा वर्कर्स एकट्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्यावर घराची जबाबदारी तर आहेच शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील त्यांना आहे. इतक्या कमी पैशात घरात केवळ दोन वेळच्या जेवणाची सोय मुश्किलने होते. त्यामुळे अनेक घरांमध्ये मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं. 

वर्षा गायकवाड यांचावर देखील त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. कमी मानधन असल्याने त्यांना दैंनदिन खर्च चालवणे देखील कठिण होतंय. त्यामुळे त्या घरकाम करतात. घरकाम करून इतके पैसेही त्यांना मिळत नाहीत. 

3 वर्षांपूर्वी मी आशा वर्कर म्हणून कामाला लागली. मला दोन मुलं आहेत. मुलगी 10वीला आणि मुलगा 12 वीला आहे. मुलगा बाहेरून 12वी देत आहे. परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणात बऱ्याच अडचणी येतात. पण तरी कसं बसं आम्ही आयुष्याचा गाडा धकलत आहोत. आशा वर्कर्सच्या कामात बरच फिरावं लागतं. बऱ्याचदा प्रवास करायला पण आमचाकडे पैसे नसतात. 

वर्षा गायकवाड, आशा वर्कर्स, मुंबई

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, बऱ्याचदा अनेक आजारांनी आम्हाला ग्रासलं आहे. ताप, सर्दी, खोकला असे आजार वारंवार होत असतात. त्यामुळे आरोग्य धोक्यात टाकून आम्ही ही सगळी कामं करत आहोत. योग्य मोबदला मिळावा म्हणून आम्ही हे काम करतो असं नाही. लोकसेवेच्या भावनेतून जरी करत असलो तरी शेवटी घर चालवायची जबाबदारी आहे. कुटुंबाचं पोट भरावं लागतं आणि त्यासाठी पैसे लागतात.

स्वाती कांबळे अभिमानाने सांगतात की, मानधन आम्हाला कमी आहे. पण, लोकसेवा करण्यात जे सुख मिळतं ते शब्दात सांगता येणार नाही. आणि हेच कारण आहे की मी इतक्या समस्या असल्या तरी माघार घेतली नाही. लोकसेवेची आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. ते पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. सर्वात महत्त्वाचं आता लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी आम्ही माघार घेणार नाही. हा लढा कायम ठेवणार. 

सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर्स  आणखी किती वर्ष हे सगळं सहन करणार. फक्त कमी मानधनच नाही तर ASHA आरोग्य कर्मचारी म्हणून कर्तव्य पार पाडताना घरगुती कामाचा दुहेरी बोझाही ते उचलत आहेत. परिणामी अयोग्य पोषण, अपुरी झोप आणि स्वतःचे आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे अशक्तपणा, कुपोषण आणि असंसर्गजन्य रोग या आजारांच्या विळख्यात अडकतात. पण स्वत:च्या जिवासाठी इतका धोका पत्करून त्यांना योग्य तो मोबदला मिळतच नाही, हे फारच खेददायक आहे. हेही वाचा

Womens Day Special : मुलगा इंडियन क्रिकेटर, आई आहे बेस्ट बसमध्ये कंडक्टर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा