मुंबईचा रहाणे कसोटीत 'अजिंक्य'


SHARES

मुंबई - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. विराट कोहलीला दुखापत झाल्याने धर्मशाला येथे होणाऱ्या कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व हे मराठमोळ्या अजिंक्य राहाणेकडे सोपवण्यात आलं. कर्णधार म्हणून कसोटी विश्वात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यातही त्याने यशस्वीरीत्या भारताला विजय मिळवून दिला. कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच संघाचं कर्णधारपद रहाणेकडे होतं. रहाणेने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत विजय प्राप्त करून दिला. पहिल्याच कसोटीत विजय प्राप्त करणारा रहाणे नववा भारतीय कर्णधार ठरला आहे. तर पाचवा मुंबईकर म्हणून रहाणेचा नंबर लागतो. 

अजिंक्य कर्णधार झाल्याचा आनंद आहे. गुढी पाडव्याच्याच दिवशी अजिंक्यला आणि त्याच्या संघाला विजय मिळाला. हा गुढीपाडवा खूप खास आहे. मी कधीच हा गुढीपाडवा विसरू शकणार नाही. 

- राधिका रहाणे, अजिंक्य रहाणेची पत्नी

याआधी धोनीने कर्णधार म्हणून खेळताना आपल्या पहिल्याच कसोटीत संघाला विजय प्राप्त करून दिला होता. भारतीय कर्णधार सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्र सिंग धोनी, अजिंक्य रहाणे यांनी पहिल्याच कसोटीत विजय मिळवला.


पहिल्याच दिवशी भारताने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे ही मॅच भारतच जिंकणार असा मला विश्वास होता. 

- मधुकर रहाणे, अजिंक्य रहाणेचे वडील

चौथ्या दिवशी 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुरली विजय 8 तर पुजारी 0 धावा करुन बाद झाले. अशा वेळी रहाणेने मैदानात उतरल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता अगदी पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजीला सुरुवात केली. रहाणेने दोन षटकार आणि चार चौकार मारत 27 चेंडूंत 38 धावांची खेळी साकारली. या वेळी अजिंक्य रहाणेचे वडील मधुकर रहाणे आणि त्याची पत्नी राधिका रहाणे यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना आपला आनंद व्यक्त केला.

संबंधित विषय