Advertisement

आशिया श्री शरीरसौष्ठव स्पर्धा पुण्यातच रंगणार


आशिया श्री शरीरसौष्ठव स्पर्धा पुण्यातच रंगणार
SHARES

आशिया श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासाठी पुरस्कर्त्यांचं पाठबळ कमी पडत असल्यामुळे ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता वाटत होती. पण आता क्रीडाप्रेमी आणि नवनियुक्त आमदार अनिकेत तटकरे यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य पेलवले आहे. पुण्याच्या बालेवाडीत २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ३३ देशांचे शरीरसौष्ठवपटू भाग घेणार आहेत.


‘भारत श्री’चा अनुभव

क्रीडा स्पर्धा आयोजनात नेहमीच पुढाकार घेणार्‍या अनिकेत तटकरे यांनी दोन वर्षांपूर्वी रायगडमधील छोट्याशा रोह्यात अशक्य आणि अवघड वाटणार्‍या भारत श्री स्पर्धेचे मोठ्या दिमाखात आयोजन केले होते. तब्बल ३० हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींची उपस्थिती लाभलेल्या नवव्या भारत श्री स्पर्धेची प्राथमिक फेरीसुद्धा त्यांनी खुल्या मैदानात घेण्याची किमया करून दाखवली होती. आता त्यांचा हाच दांडगा अनुभव पुण्यातील आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत संघटनेच्या उपयोगी पडणार आहे.


स्पर्धा भव्यदिव्य करण्याचे आश्वासन

पुण्याच्या बालेवाडी येथे होणारी ही स्पर्धा संस्मरणीय करू, असे वचन तटकरे यांनी भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे (आयबीबीएफ) सरचिटणीस चेतन पाठारे यांना दिले. शरीरसौष्ठवपटूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ. तसेच स्पर्धेची अंतिम फेरी ग्लॅमरस आणि डोळे दिपवणारी असेल व ३३ देशांतून येणारे खेळाडू भारताच्या आदरातिथ्याने भारावतील, असे आश्वासन तटकरे यांनी दिले.


४०० खेळाडूंचा सहभाग

यंदा आशिया श्री स्पर्धेत ३३ देशांतील ४०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत. या स्पर्धेत भारतासह अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, भूतान या शेजारी देशांसह चीन, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, मंगोलिया, चायनीज तैपेईसारख्या देशांतील भीमकाय देहयष्टीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


हेही वाचा -

'भारत श्री' विजेत्यांना मिळणार ५० लाखांची बक्षिसं

फझल अत्रचलीवर यू मुंबाची १ कोटींची बोली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा