Advertisement

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारे आणि पहिले अर्जून पुरस्कार विजेते म्हणून त्यांची ओळख आहे.

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन
SHARES

भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं बुधवारी निधन झालं.  ते ८८ वर्षाचे होते. त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारे आणि पहिले अर्जून पुरस्कार विजेते म्हणून त्यांची ओळख आहे. नाटेकर यांना १९६१ साली अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

भारताबाहेर विजेतेपद मिळवणारे नंदू नाटेकर पहिले बॅडमिंटन खेळाडू आहेत. नाटेकर यांनी १५ वर्षाच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. यामध्ये १७ राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे. ६ एकेरी, ६ दुहेरी, ५ मिश्र दुहेरी स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

सांगलीमध्ये जन्म झालेल्या नाटेकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी १९५३ साली सर्वप्रथम देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९५४ मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. नाटेकर यांनी भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करताना थॉमस कप स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. त्यांनी या स्पर्धेत १९५१ ते १९६३ सालादरम्यान एकेरीत १६ पैकी १२ सामने जिंकले, तसेच दुहेरीत १६ पैकी ८ सामने जिंकले. त्यांनी या स्पर्धेत १९५९,१९६१ आणि १९६३ साली भारताचे नेतृत्व देखील केले. त्यांनी १९६५ साली जमैका येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यांनी १९५६ साली क्वालालंपूर येथे सालांगोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे एकेरीत विजेतेपद मिळवले होते. त्यावेळी ते बॅडमिंटनमध्ये भारताकडून पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवणारे खेळाडू ठरले होते. ते बॅडमिंटन व्यतिरिक्त टेनिस देखील उत्तम खेळायचे. त्यांनी १९५१-५२ साली ज्यूनियर टेनिस चॅम्पियनशीपमध्ये उपविजेतेपद मिळवले होते. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा