SHARE

भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) अाणि इंडियन अाॅईल या इंधन उद्योगातील अाघाडीच्या कंपन्यांमध्ये अाता बाॅम्बे गोल्ड कप हाॅकी स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार अाहे. चर्चगेट येथील एमएचएएल-महिंद्रा स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, बीपीसीएलने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत गेल्या वर्षीच्या उपविजेत्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ५-२ असा बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर रंगलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार रघुनाथ वाेक्कालिगाने निर्णायक गोल झळकावत इंडियन अाॅईलला ४-३ असा थरारक विजय मिळवून दिला. अाता बुधवारी दुपारी अंतिम सामन्याचा थरार रंगणार अाहे.


बीपीसीएलच्या अामीर खानची हॅटट्रिक

मोहम्मद अामीर खानने सुरुवातीपासूनच अाक्रमक हल्ले चढवत पीएनबीचा बचाव खिळखिळा करून टाकला. १०व्या, १२व्या अाणि १५व्या मिनिटाला गोल करत अामीर खानने हॅटट्रिक साजरी करत बीपीसीएलला ३-० अशी भक्कम अाघाडी मिळवून दिली. पीएनबी संघ दडपणाखाली असताना गगनदीप सिंग ज्यु.ने पेनल्टी काॅर्नरवर गोल करून अापल्या संघाला दिलासा मिळवून दिला. मात्र तुषार खांडेकर अाणि वरुण कुमार यांनी गोल करत बीपीसीएलला ५-१ अशा अाघाडीवर अाणले. अखेरच्या क्षणी पीएनबीच्या नवीनने गोल केला, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.


इंडियन अाॅईलचा थरारक विजय

अफ्फान युसूफने २४व्या अाणि २५व्या मिनिटाला गोल करून इंडियन अाॅईलला अाघाडीवर अाणले खरे, पण पोनाचा एम.जी. (३४व्या मिनिटाला) अाणि राजू पाल (५७व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे दक्षिण मध्य रेल्वेने २-२ अशी बरोबरी साधली. अफ्फान युसूफने पुन्हा एकदा ६२व्या मिनिटाला गोल करून इंडियन अाॅईलला अाघाडीवर अाणले अाणि अापली हॅटट्रिक साजरी केली. पण राजू पालच्या (६५व्या मिनिटाला) गोलमुळे दक्षिण मध्य रेल्वेने त्यांना तोडीस तोड उत्तर दिले. अखेर रघुनाथ वोक्कालिगाने अखेरच्या क्षणी (६८व्या मिनिटाला) गोल करत इंडियन अाॅईलला थरारक विजय मिळवून दिला.


संबंधित विषय
ताज्या बातम्या