दीपनची प्रथम मानांकित फारुखवर मात

  Bandra
  दीपनची प्रथम मानांकित फारुखवर मात
  मुंबई  -  

  ग्रॅंड मास्टर दीपन चक्रवर्तीने दहाव्या महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत ताजिकिस्तानचा प्रथम मानांकित ग्रॅंड मास्टर अमानातोव्ह फारुखवर 28 चालीत मात करत 'अ' गटात सातव्या फेरीत सनसनाटी विजय मिळवला.

  पहिल्या पटावर दीपन चक्रवर्ती विरुद्ध अमानातोव्ह फारुख यांच्यामध्ये रंगलेला सामना सिसिलियन बचाव पद्दतीने सुरू झाला. दीपनने नेजडोर्फ पद्धतीचा वापर करत फारुखच्या राजावर जोरदार हल्ला चढवला. सतराव्या चालीत फारुखने दीपनच्या घोड्यावर हल्ला केला. त्याचा बळी देत दीपनने आक्रमण अधिक तीव्र केले. त्यानंतर उंटाचे आमिष दाखवून दीपनने प्रतिस्पर्ध्याच्या राजाला कोंडीत पकडले आणि 28 व्या चालीला फारुखने पराभव मान्य केला. दुसऱ्या पटावर ग्रँड मास्टर दिप्तयान घोष विरुद्ध ग्रँड मास्टर होसैन इनॅमुल यामधील डाव फ्रेंच डिफेन्स पद्धतीने सुरू झाला. या दोघांनी कोणताही धोका न पत्करता 13 व्या चालीत बरोबरी स्वीकारली.

  तिसऱ्या पटावर तुखेव अॅडम विरुद्ध सायंतन दास यांच्यामध्ये सिसिलियन बचाव पद्धतीने सुरू झालेल्या डावात शेवटी सायंतन दासने शरणागती पत्करली. चौथ्या पटावर ग्रँड मास्टर रेहमान झिऔर विरूद्ध खेळतांना निलोत्पल दासने वजीरा पुढील प्याद्याने डावाची सुरुवात केली. पण रेहमानच्या काही चुकांमुळे 46 व्या चालीला रेहमानने पराभव स्वीकारला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.