Advertisement

राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत जय शिव, संघर्ष यांचे शानदार विजय


राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत जय शिव, संघर्ष यांचे शानदार विजय
SHARES

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अायोजित राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत ठाण्याचा जय शिव अाणि मुंबई उपनगरचा संघर्ष संघाने विजयी सलामी दिली. जय शिवने मुंबईच्या पिंपळेश्वर संघाचा ३५-२२ असा पराभव केला तर संघर्षने प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा या संघाला ४७-३२ अशी पराभवाची धूळ चारली. अन्य सामन्यात, मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने अोम ज्ञानदीप मंडळाचा ३१-२५ असा पराभव केला.


प्रभादेवीतील चवन्नी गल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी मंत्री सचिन अहिर उपस्थित होते तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.


जय शिवकडून सिद्धेश येसणे, ऋशिकेश कनेरकर यांनी चांगली आक्रमणे केली. सोहम बेलोसेच्या पकडीही त्यांना फलदायी ठरल्या. पिंपळेश्वरकडून अनिकेत चिकणे, वृषभ कुलकर्णी आणि अनिकेत कांबळे यांचा खेळ चांगला झाला.



संघर्षने सिद्धीप्रभाचा सुरुवातीचा प्रतिकार मोडून काढत विश्रांतीला १९-१२ अशी आघाडी मिळविली. सिद्धीप्रभाच्या विवेक मोरेने चांगल्या चढाया करून चमक दाखवली पण दीपक रेमाजेच्या चढाया आणि रोहित पानकर व प्रथमेश निकम या दोघांनी बचावाची भक्कम बांधणी करताच सिद्धीप्रभाच्या खेळाला उतरती कळा लागली. संघर्षने त्यांच्यावर बाजी उलटवताना दोन लोन चढवत विजय पक्का केला.


स्वस्तिकच्या या विजयाचा शिल्पकार होता अष्टपैलू अलंकार पाटील. त्याने सुरज धावडेच्या मदतीने प्रतिस्पर्ध्यांवर उत्तरार्धामध्ये तीन लोण चढविताना त्यांचा बचाव पार खिळखिळा केला. प्रीतम गुरवच्या चढाया आणि राहुल शिरोडकर व संकेत शिंदे यांच्या बचावातील कामगिरीमुळे ओम ज्ञानदीपने चांगली सुरुवात केली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा