Advertisement

रणजी करंडक स्पर्धेत मुंबईची दयनीय अवस्था


रणजी करंडक स्पर्धेत मुंबईची दयनीय अवस्था
SHARES

४१ वेळा रणजी करंडकाला गवसणी घालणाऱ्या बलाढ्य मुंबईची उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिल्याच दिवशी दयनीय अवस्था झाली अाहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमच्या हिरव्यागार खेळपट्टीवर कर्नाटकचा कर्णधार अाणि वेगवान गोलंदाज विनय कुमारने मुंबईला सुरुवातीलाच हादरे दिले. या धक्क्यातून मुंबईचा संघ सावरूच शकला नाही. त्यामुळे मुंबईचा पहिला डाव अवघ्या ५६ षटकांत १७३ धावांवर अाटोपला. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला अालेल्या धवल कुलकर्णीने ७५ धावांची खेळी केल्यामुळे मुंबईला पावणे दोनशे धावांपर्यंत मजल मारता अाली.

कर्नाटकने प्रत्युत्तरादाखल पहिल्या दिवसअखेर २९ षटकांत १ बाद ११५ अशी धावसंख्या उभारत या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं अाहे. रणजी करंडकाच्या या मोसमात तुफान फाॅर्मात अालेल्या मयांक अगरवालने पुन्हा एकदा दमदार खेळी करत कर्नाटकला फ्रंटफूटवर अाणले अाहे. पहिल्या दिवसअखेर मयांक ६२ धावांवर खेळत अाहे.


विनय कुमारची हॅटट्रिक

विनय कुमारने सुरुवातीलाच हॅटट्रिक नोंदवत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विनयकुमारने या मोसमात दोन शतके झळकावणाऱ्या पृथ्वी शाॅचा अडसर दूर केला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जय बिश्तला माघारी पाठवल्यावर त्याने अाकाश पारकरला पायचीत पकडत हॅटट्रिक साजरी केली. रणजी करंडकाच्या बाद फेरीत हॅटट्रिक नोंदवणारा तो सहावा गोलंदाज ठरला अाहे.


धवल कुलकर्णीची झुंजार खेळी

मुंबईचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतत असताना धवल कुलकर्णीने  नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन ७५ धावांची खणखणीत खेळी साकारली. विशेष म्हणजे ९ बाद १०३ अशी मुंबईची स्थिती असताना धवलने दहाव्या विकेटसाठी शिवम मल्होत्रा याच्यासह ७० धावांची भागीदारी रचली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा