Advertisement

बाल दिन विशेष : ९ वर्षांच्या ओमला बनायचंय बुद्धिबळ चॅम्पियन!


बाल दिन विशेष : ९ वर्षांच्या ओमला बनायचंय बुद्धिबळ चॅम्पियन!
SHARES

विश्वनाथन आनंदचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बुद्धिबळामध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भांडुप येथील जंगल मंगल रोड येथे राहणारा नऊ वर्षांचा ओम कदम पाहात आहे. ते स्वप्न तो नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास त्याचे पालक आणि गुरुजनांनी व्यक्त केला आहे.


बुद्धिबळात अव्वल स्थान पटकावणारा ओम

बुद्धिबळाच्या पटावर सहजपणे चाल करून प्रतिस्पर्ध्याचे पानिपत करणारा बुद्धिबळाचा राजा ओम कदम! याचे वय अवघे नऊ वर्ष. बुद्धिबळावरच्या पटावरील त्याची प्रत्येक चाल समोरच्याला थक्क करून सोडते. काही काळातच समोरचा प्रतिस्पर्धी त्याच्या व्यूहरचनेमुळे गारद होऊन जातो. नुकत्याच हरियाणात पार पडलेल्या ३१ व्या नॅशनल अंडर ९ ओपन चेस चॅम्पियनशिपमध्ये केरळच्या जॉन वेणीला नमवून त्याने अव्वल स्थान पटकावले. याचसोबत महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवण्याचा निर्धार केला.


बुद्धिबळ स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मानस

आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेल्या वर्ल्ड युथ बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ओम कदम याच्यावर आहे. ही स्पर्धा जिंकून वर्ल्ड चॅम्पियन बनून भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्याचा मानस असल्याचे ओम अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो.


सातव्या वर्षापासून घेतो बुद्धिबळाचे धडे

ओमच्या पालकांनी ओमला वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यासाठी क्लास लावले. खेळातली रुची आणि अनुभवी मातब्बर खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे ओमने यशाचे शिखर गाठायला सुरुवात केली. या सर्व ट्रॉफीज पाहून त्यांच्या कौशल्याची प्रचिती येते. आई- वडिलांचा उर अभिमानाने फुलून येतो. पालकांचा एक योग्य निर्णय आपल्या मुलांचं भविष्य उजळून टाकू शकतो, हा अनुभव ओमकडे पाहिल्यावर आपल्याला येतो.


काय म्हणाले ओमचे वडील?

'मुलाची रुची ओळखून त्याला योग्य रुळावर आणणे गरजेचे आहे. तेच आम्ही केलं', असे ओमचे वडील मनीष कदम सांगतात. ओमचे वडील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कर्मचारी असून त्यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच. परंतु ओमचे यश पाहता त्याच्या घरच्यांनी काटकसर करून कुठलीही मदत न घेता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रात प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला पाठबळ दिले. परंतु, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवण्यासाठी ओमला गरज आहे ती आर्थिक मदतीची.


रोज करतो सराव

ओम सध्या भांडुपमधील एन. इ. एस. या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत असून दिवसाला चार तासांचा सराव करतो. तो सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचीही तयारी करत आहे. आठवडा-आठवडा स्पर्धेसाठी लागत असल्यामुळे कधीकधी ओमला शाळेत जाता येत नाही. असं असलं तरी देखील घरच्या घरी अभ्यास करून ओमने आतापर्यंत त्याची शैक्षणिक गुणवत्ता देखील टिकवून ठेवली आहे.

"मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रातच करिअर करण्याचे धैर्य पालकांनीच द्यावे. यामुळेच त्यांचा आत्मविश्वास वाढतो', अशी भावना ओमची आई सविता कदम यांनी व्यक्त केली. त्याचे आणि त्याच्या आईवडिलांचे वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न ओमला पूर्ण करायचे आहे. त्याच्या या यशोगाथेस आणि भावी वाटचालीस 'मुंबई लाईव्ह'च्या शुभेच्छा!



हेही वाचा

कुश आणि हर्शिताचा बुद्धिबळ स्पर्धेत विजय

मुंबईकर बुद्धिबळपटू ऋषभची श्रीलंकेत दमदार कामगिरी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा