मुंबईचा पंकज कॅरम स्पर्धेत विजयी

Mulund
मुंबईचा पंकज कॅरम स्पर्धेत विजयी
मुंबईचा पंकज कॅरम स्पर्धेत विजयी
मुंबईचा पंकज कॅरम स्पर्धेत विजयी
See all
मुंबई  -  

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने मुलुंड जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटामध्ये मुंबईच्या अनुभवी पंकज पवारने अंतिम फेरीत मजल मारलेल्या पुण्याच्या अभिजित त्रिपनकारला 25-1,25-7 असे सहज पराभूत करून विजय मिळवला.

रियाझ अकबरला अली, संदीप देवरुखकर आणि उपांत्य सामन्यात विश्व विजेत्या प्रशांत मोरेवर विजय मिळवणाऱ्या पुण्याच्या अभिजीतला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. परंतु अनुभव असलेल्या पंकजने सर्वांचा अंदाज चुकीचा ठरवून अभिजीतला डोके वर काढू दिले नाही. आक्रमणाच्या जोरावर प्रथमच अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या अभिजीतने सपशेल नांगी टाकली. 

महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये अपेक्षेप्रमाणे मुंबईकडून खेळणाऱ्या आयेशा मोहम्मदने युवा खेळाडू मुंबईची नीलम घोडकेला 25-18,24-11 असे सरळ दोन गेममध्ये हरविले आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुष एकेरी लढतीत मुंबईच्या प्रशांत मोरेने जितेंद्र काळे (मुंबई) याला तीन गेममध्ये 1-25,25-14,25-1 असे तर महिलांमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या शिल्पा पळणीटकरने ठाण्याच्या मीनल लेले खरेला 25-14,24-25,25-22 असे पराभूत केले.

मुलुंड जिमखान्याचे अध्यक्ष चेतन साळवी यांच्याहस्ते आणि सचिव प्रकाश पाटील, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि मुंबई उपनगरचे सचिव इक्बाल नबी यांच्या उपस्थितीत विजेत्या पंकजला 51 हजार रुपये तर आयेशाला 21 हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. पुरुष व महिला गटातील पहिल्या 8 खेळाडूंना एकंदर 1 लाख 50 हजारांची रोख पारितोषिके देण्यात आली. अध्यक्ष चेतन साळवींनी कॅरम खेळाला अधिक लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी जिमखान्यातर्फे प्रतिवर्षी ही स्पर्धा घेण्याचे जाहीर केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.