Advertisement

तळवळकरांच्या क्लासिकल शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 20 लाखांचे बक्षीस


तळवळकरांच्या क्लासिकल शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 20 लाखांचे बक्षीस
SHARES

शरीरसौष्ठव स्पर्धेकडे तरुण वर्ग नेहमीच आकर्षित होतो. त्यातच तळवलकर यांची क्लासिकल शरीरसौष्ठव स्पर्धा ही भारतातील सर्वात ग्लॅमरस आणि श्रीमंतांमध्ये ओळखली जाते. यंदा तळवळकर क्लासिक 2017 ही स्पर्धा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात येत्या 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेच्या सोबतीलाच मोजक्या मिश्र दुहेरीतील फिट अॅण्ड फाइन जोड्या आपलं तालबद्ध फिटनेस प्रदर्शन देखील येथे दाखवणार आहेत.

भारतातील सर्वात पीळदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव उंचावणाऱ्या 30 दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा केंद्र सरकारची मान्यता असलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने होणार आहे. पुरूष आणि महिलांची मिश्र स्पर्धाही मोजक्या जोड्यांच्या सहभागामुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल. स्पर्धेची प्राथमिक फेरी जुहू येथील समुद्रकिनारी असलेल्या जुहू हॉटेलमध्ये 27 नोव्हेंबरला खेळवली जाईल, तर अंतिम फेरी तळवलकर क्लासिकची टॉप टेन स्पर्धा 28 नोव्हेंबरला षणमुखानंद सभागृहात पार पडणार आहे.

नुकत्याच मंगोलिया येथे झालेल्या मि. वर्ल्ड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण, सलग तीनवेळा भारत श्री काबिज करणारा सुनीत जाधव, मि. आशियाचा तीनवेळा मानकरी ठरलेला बॉबी सिंग, गतविजेता राम निवास, सागर जाधव, अक्षय मोगरकर सारखे बाहुबली आपल्या पीळदार स्नायूंनी मुंबईकरांना भुरळ घालण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद असलेले रेल्वे आणि महाराष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. त्याखेरीज ओडिशा, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा, उत्तर प्रदेशचे स्टार देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.


20 लाखांची बक्षिसे आणि मिश्र जोडी स्पर्धा

20 लाखांची बक्षिसे असलेल्या तळवळकर क्लासिक या स्पर्धेतील विजेता 6 लाखांचा मानकरी ठरेल. टॉप टेनवर बक्षिसांचा पाऊस पाडला जाणार असून उपविजेता 3 लाखांचा तर दहावा क्रमांक 50 हजारांचा धनी होईल. मिश्र जोडींच्या या स्पर्धेत विजेती जोडीही लखपती होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.


गेली सहा दशके मी शरीरसौष्ठवाशी बांधील आहे. समाजात फिटनेसविषयी जागृकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी म्हणून मी तळवळकर क्लासिकच्या नावाने शरीरसौष्ठवाचा मोठा सोहळा पुन्हा एकदा त्याच जोशात आयोजित करण्याचे ठरवले आहे. यंदा मिश्र जोडीचा फिजिक इव्हेंटही ठेवला आहे. हा इव्हेंट सर्व विवाहित जोडप्यांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी आमची अपेक्षा आहे.

मधुकर तळवलकर, व्यायाम महर्षी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा