Advertisement

रजत शर्माच्या 5 गोलमुळे युनियन बॅंकेला विजेतेपद


रजत शर्माच्या 5 गोलमुळे युनियन बॅंकेला विजेतेपद
SHARES

'रिंक हॉकी टुर्नामेंट'मध्ये रजत शर्माने झळकावलेल्या 5 गोलच्या जोरावर युनियन बॅंकेने सेंट्रल रेल्वेविरूद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत विजेतेपद पटकावले. 'कार्मेल स्पोर्ट्स कमिटी आयोजित' हॉकी स्पर्धेतील अंतिम सामना गुरूवारी माऊंट कार्मेल चर्च कम्पाऊंड, वांद्रे येथे खेळविण्यात आला. विजेतेपद आपल्या पारड्यात खेचण्यासाठी युनियन बँक आणि सेंट्रल रेल्वे या दोन्ही संघांनी पुरेपूर प्रयत्न केले. अखेर 6-4 अशा फरकाने युनियन बँकेने सेंट्रल रेल्वे संघाला नमवत विजेतेपद पटकावले.

या सामन्यात 6 पैकी 5 गोल नोंदवून रजतने आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सेंट्रल रेल्वे संघासाठी रजत हाच प्रमुख अडथळा ठरला. रजतने पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळी करून संघाला आघाडीवर आणले. रजतचा सहकारी प्रिन्स चौरसिया यानेही उत्तम कौशल्य दाखवून एक गोल झळकावला.

सेंट्रल रेल्वे संघाच्या नारद बहादूरने 3 गोल करत युनियन बँकेला तुल्यबळ लढत दिली. त्याला राजेंद्र पवार याने (1 गोल) चांगली साथ दिली. त्यानंतर सेंट्रल रेल्वेने अनेकदा गोल करण्याचे प्रयत्न केले, पण युनियन बॅंकेचा बचावपटू अनुप वाल्मिकीपुढे एकाचाही निभाव लागला नाही. त्याने गोलजाळ्याचे उत्कृष्ट रक्षण करत कुणालाही आपल्या क्षेत्रात येऊ दिले नाही. गोलकीपर करण ठाकूर यानेही चांगली कामगिरी केली. अखेर दोन गोलच्या फरकाने हा सामना आणि स्पर्धेचे विजेतेपद युनियन बॅंकेने आपल्या खिशात घातले.

अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून रजत शर्माला गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर म्हणून हॉकी सांताक्रूझ संघाच्या ट्रायडंट परेरा याला पारितोषिक देण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा