महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा : विकास धारिया, आयेशा साजिद यांना विजेतेपद

विकास धारिया आणि ऐशा खोकावाला यांनी शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत एकेरी गटात विजेतेपद पटकावले.

महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा : विकास धारिया, आयेशा साजिद यांना विजेतेपद
SHARES

मुंबईतील शिवाजी पार्क जिमखानातर्फे कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बाराव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष ऐकरी व महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारिया, दुसरी मानांकित माजी सार्क व राज्य विजेती आयेशा साजिद यांनी विजेतेपद पटकाविलं आहे.

अंतिम फेरीत मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारियानं ३ गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत चौथा मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिफणकरचा २५-६, १३-२५, २५-४ असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाचा मानकरी ठरला. त्यानं रोख रक्कम २५,००० चं बक्षिस व चषक पटकाविलं. उपविजेता अभिजित त्रिफणकरला रोख रक्कम १२,५०० व चषक देऊन गौरविण्यात आलं.

पहिल्या गेममध्ये अप्रतिम शॉटस्‌ व आक्रमक खेळ करत मुंबईच्या विकास धारियानं सातव्या बोर्डपर्यंत २०-६ अशी आघाडी घेत आठव्या बोर्डमध्ये ५ गुण मिळवून २५-६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चौथा मानांकित अभिजित त्रिफणकरनं शांतचित्तानं आक्रमक व बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत सहाव्या बोर्डपर्यंत १६-११ अशी आघाडी घेत नंतरच्या बोर्डमध्ये ९ गुण मिळवून २५-११ असा दुसरा गेम जिंकून १-१ ने बरोबरी केली.

निर्णायक तिसऱ्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या विकास धारियानं ६ व्या बोर्डपर्यंत २०-४ गुणांनी आघाडी घेतली. त्यानंतर सातव्या बोर्डमध्ये त्याच्या ब्रेकमध्ये कटशॉटस्‌चं प्रात्यक्षिक घडवित ५ गुणांचा बोर्ड मिळवून २५-४ असा जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरलं.

तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या योगश डोंगडेनं ३ गेम रगंलेल्या लढतीत मुंबईच्याच माजी राज्य विजेता पंकज पवारला २५-६, ११-२५, २५-१८ अशी मात करत रोख रक्कम ८,००० चषक व प्रमाणपत्र पटकाविलं.

तत्पूर्वी झालेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अभिजित त्रिफणकरनं सरळ २ गेममध्ये मुंबईच्या पंकज पवारचा २५-३, २५-१२ असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या विकास धारियाने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत मुंबईच्याच माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेचा २५-११, २५-८ असे दोन गेममध्ये निष्प्रभ करून अंतिम फेरी गाठली.

महिला एकेरीमध्ये दुसरी मानांकित मुंबईच्या माजी सार्क व राज्य विजेती आयेशा साजिदनं सरळ २ गेममध्ये मुंबईच्या मिताली पिंपळेला २५-९, २५-० नं पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरलं व रोख रक्कम ८,००० चषक व प्रमाणपत्र याची मानकरी ठरली. उपविजेती मिताली पिंपळेला रु. ६,०००, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या मैत्रेयी गोगटेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत ठाण्याच्या चैताली सुवारेचा २५-१६, २५-५ अशी झुंज मोडीत काढून रु. ४,०००, चषक व प्रमाणपत्रावर समाधान मानावं लागलं.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या आयेशा साजिदनं मुबंईच्या मैत्रेयी गोगटेचं आव्हान ३ गेम रंगलेल्या लढतीत २१-२५, २५-११, २५-० अशी मात करत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या मिताली पिंपळेनं बिनमानांकित ठाण्याच्या चैताली सुवारेचा सरळ २ गेम रंगलेल्या एकतर्फी लढतीत २५-३, २५-१४ असे नमवून अंतीम फेरी गाठली.हेही वाचा -

सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा 'अनुवाद पुरस्कार'

उन्हाळी सुट्टी निमित्ताने ७८ विशेष गाड्यासंबंधित विषय