पश्चिम रेल्वेने पटकावले विहंग खो-खोचे जेतेपद


SHARE

एेरोली येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक गट खो-खो स्पर्धेत पश्चिम रेल्वेने विजेतेपदाला गवसणी घातली. यजमान विहंग क्रीडा मंडळ अाणि पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघांमध्ये पुरुष गटाचा अंतिम सामना रंगणार अाहे.


मध्य रेल्वेचे कडवे अाव्हान

व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वे अाणि मध्य रेल्वे यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र पश्चिम रेल्वेने ११-१० अशी एका गुणाच्या फरकाने मध्य रेल्वेवर मात करत अजिंक्यपदावर नाव कोरले. पश्चिम रेल्वेच्या अमोल जाधव (१.४० मि. व २ मि.), तक्षक गौंडाजे (१.३० मि. व १.३० मि.) तसेच प्रसाद राडिये (२.१० मि., १.५० मि. व २ गडी) यांनी विजयश्री खेचून आणली. मध्य रेल्वेच्या मिलिंद चावरेकर (२ मि., १.३० मि. व ३ गडी) व विजय हजारे (२ मि., २.१० मि. व १ गडी) यांचे प्रयत्न तोकडे पडले.


उपांत्य फेरीत विहंग, नवमहाराष्ट्रची बाजी

पुरूषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान विहंग क्रीडा मंडळाने उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्टस क्लबचे आव्हान १३-१२ असे एका गुणाने परतवून लावत अंतिम फेरी गाठली. विहंगच्या महेश शिंदेने (१.४० मि., २.१० मि. व २ गडी) दमदार खेळ करीत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तगड्या नवमहाराष्ट्र संघाने सांगलीच्या हिंद केसरी संघाचा १३-११ असा दोन गुणांनी पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. नवमहाराष्ट्राच्या मयुरेश साळूंके (१.१०मि., २.२० मि. व ३ गडी) , प्रतिक बांगर (१.१० मि. व १.५० मि.) , प्रतिक वाईकर (१.४० मि., २ मि. व १ गडी) व अक्षय गणपुले (२.२० मि., १ मि. व २ गडी) यांचे महत्त्वाचे योगदान होते.


संबंधित विषय