Advertisement

EXCLUSIVE : अंशुमन बनला 'एकच प्याला'मधील तळीराम

सर्वसामान्यांमध्ये दडलेल्या असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाला सलाम करणारा अभिनेता अंशुमन विचारे सध्या इतिहासाच्या पानात दडलेल्या एका गाजलेल्या नाटकाच्या तालिमीत व्यग्र आहे. जवळपास १९१७ मध्ये प्रसिद्ध साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या लेखणीतून अवतरलेलं १०० वर्षांहूनही जुनं असलेलं 'संगीत एकच प्याला' हे नाटक पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर येणार आहे.

EXCLUSIVE : अंशुमन बनला 'एकच प्याला'मधील तळीराम
SHARES

अभिनेता अंशुमन विचारेनं आपल्या बहुआयामी अभिनयकौशल्यानं कधी प्रेक्षकांना हसवलं, तर कधी रडवलं आहे. हाच अंशुमन आता 'संगीत एकच प्याला'मधील तळीराम बनला आहे.


१०० वर्षांहूनही जुनं

सर्वसामान्यांमध्ये दडलेल्या असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाला सलाम करणारा अभिनेता अंशुमन विचारे सध्या इतिहासाच्या पानात दडलेल्या एका गाजलेल्या नाटकाच्या तालिमीत व्यग्र आहे. जवळपास १९१७ मध्ये प्रसिद्ध साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या लेखणीतून अवतरलेलं १०० वर्षांहूनही जुनं असलेलं 'संगीत एकच प्याला' हे नाटक पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर येणार आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेलं हे नाटक १९१९ मध्ये सर्वप्रथम रंगभूमीवर आलं होतं. दिग्दर्शक विजय गोखले पुन्हा एकदा हे नाटक मराठी रसिकांसमोर आणत आहेत. या नाटकातील गाजलेली तळीरामची भूमिका अंशुमन साकारत आहे. 'मुंबई लाइव्ह' एक्सक्लुझीव्ह बातचित करत अंशुमननं या ऐतिहासिक नाटकातील भूमिकेविषयी सांगितलं.


स्वप्नातही वाटलं नव्हतं

गडकरींसारख्या थोर साहित्यिकानं लिहिलेल्या नाटकात शरद तळवलकर, राजा गोसावी, दामूअण्णा माळी, चित्तरंजन कोल्हटकर यांसारख्या दिग्गजांनी अजरामर केलेली तळीरामची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी आपल्याला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. या निमित्तानं गडकरींच्या लेखनशैलीचा जवळून अनुभव घेता आला. विद्याधर गोखलेंसारख्या नाट्यकर्मीचा वारसा लाभलेल्या अभिनेता-दिग्दर्शक विजय गोखले यांच्या दिग्दर्शनाखाली पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली. हे सर्व स्वप्नवत वाटत असलं, तरी फार मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचं भानही आहे.


काळानुरूप बदल

जवळजवळ १०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेलं हे नाटक आजच्या पिढीसमोर आणताना अर्थातच काही बदल करण्यात आले असले, तरी गडकरींच्या लेखनाला आणि नाटकाच्या मूळ गाभ्याला धक्का लावण्याचं पाप करण्यात आलेलं नाही. नाटक जरी पारंपरिक असलं तरी त्याला मॅाडर्न लुक देण्यात आला आहे. पूर्वी हे नाटक पडद्यावर सादर केलं जायचं, पण आता प्रॅापर सेट लावण्यात येणार आहे. या नाटकातील व्यक्तिरेखांच्या लुकमध्ये थोड्या फार प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जे काही बदल करण्यात आले आहेत ते आजच्या पिढीतील रसिकांना नक्कीच भावतील असे आहेत.


तळीराम कसा आहे?

दारूच्या व्यसनामुळं एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वत:चा, आपल्या पत्नीचा आणि संसाराचा कसा नाश करून घेतो, याचं कथानक या नाटकात आहे. गोखलेंनी जेव्हा मला या नाटकात तळीराम साकारण्याबाबत विचारलं, तेव्हा मला माझ्या पद्धतीनं ही व्यक्तिरेखा साकारण्याची मुभा दिली. त्यामुळं जे रसायन तयार झालं आहे, ते खूप वेगळं आहे. दारू कशाप्रकारे सर्वस्व आहे आणि तिला उगाच बदनाम करण्यात आलं आहे असं मानणारा तळीराम आहे. त्याच्यासाठी दारू हे अमृत आहे.


पुण्यस्मरण वर्षानिमित्त...

गोविंदाग्रज , बाळकराम, सवाई नाटकी अशा टोपणनावांनी साहित्यलेखन करणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या पुण्यस्मरण वर्षानिमित्त 'एकच प्याला' हे नाटक पुर्नजीवित करण्यात येत आहे. मागील महिन्याभरापासून या नाटकाची तालीम सुरू आहे. या नाटकात शुभांगी भुजबळ माझ्या पत्नीच्या म्हणजेच गीताच्या, संग्राम समेळ सुधाकरच्या, तर संपदा माने सिंधूच्या भूमिकेत दिसेल. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ११ मे रोजी कल्याणमधील अत्रे रंगमंदिरात होणार असून, १४ मे रोजी दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये पुढील प्रयोग होणार आहे.


रंगशारदाची निर्मिती

रंगशारदा प्रतिष्ठाननं या नाटकाची निर्मिती केली असून, दिग्दर्शनासोबतच रंगावृत्तीही विजय गोखले यांची आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं असून, प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. अरविंद पिळगांवकर या नाटकाचे संगीत मार्गदर्शक आहेत, सूत्रधार गोठ्या सावंत आहेत. पडद्यामागं गेलेली आणखी एक गाजलेली नाट्यकृती 'संगीत एकच प्याला'च्या माध्यमातून पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.



हेही वाचा -

'बंदिशाळा'मध्ये पहा डॅशिंग मुक्ता

मृणालचा 'वेलकम' लुक!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा