Advertisement

“नाटक पहा, आवडलं तर पैसे द्या”

२६ फेब्रुवारीपासून ‘चॅलेंज’ या नाटकाचे जवळजवळ ३२ प्रयोग झाले. नाटक पाहिलेल्या सर्वांनीच कौतुकाची थाप मारल्याने आता या नाटकाचे काही प्रयोग ‘स्वेच्छा मूल्य’ या तत्त्वावर सादर केले जात आहेत. सावरकरांची भूमिका साकारणारा निखिल राऊत आणि निर्माते दिनेश पेडणेकर यांनी या नाटकाच्या निमित्ताने ‘मुंबई लाइव्ह’शी खास संवाद साधला.

“नाटक पहा, आवडलं तर पैसे द्या”
SHARES

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार ब्रिटिशकाळातही प्रेरणादायी होते, आजही आहेत आणि भविष्यातही राहतील. याच विचारांनी भारलेलं ‘चॅलेंज’ हे नाटक विनामूल्य पाहण्याची संधी मराठी नाट्यरसिकांना लाभली आहे. “नाटक पहा, आवडलं तर पैसे द्या” असं म्हणत ‘स्वेच्छा मूल्य’ या तत्त्वावर ‘चॅलेंज’ या नाटकाचे काही निवडक प्रयोग सादर करण्यात येत आहेत. प्रेक्षकांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

अनामिका निर्मित, साईसाक्षी प्रकाशित आणि मुक्ता बर्वे प्रस्तुत ‘चॅलेंज’ या नाटकाने मागील काही दिवसांपासून मराठी रसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित या नाटकातील विचार, विषय आणि आशय रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरत आहे. 

२६ फेब्रुवारीपासून आजवर या नाटकाचे जवळजवळ ३२ प्रयोग झाले. नाटक पाहिलेल्या सर्वांनीच कौतुकाची थाप मारल्याने आता या नाटकाचे काही प्रयोग ‘स्वेच्छा मूल्य’ या तत्त्वावर सादर केले जात आहेत. सावरकरांची भूमिका साकारणारा निखिल राऊत आणि निर्माते दिनेश पेडणेकर यांनी या नाटकाच्या निमित्ताने ‘मुंबई लाइव्ह’शी खास संवाद साधला.


‘स्वेच्छा मूल्य’ कशासाठी?

‘स्वेच्छा मूल्य’ या संकल्पनेबाबत निर्माते दिनेश पेडणेकर म्हणाले की, ‘चॅलेंज’ हे नाटक रसिकांना खूप आवडत आहे, पण सावरकरांचे विचार अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘स्वेच्छा मूल्य’ची संकल्पना अंमलात आणली आहे. सावरकर स्मारक येथे जेव्हा या नाटकाचा २९ वा प्रयोग झाला, तेव्हा तिथे या नाटकासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यावेळी काही जणांनी सढळ हस्ते मदत केली. त्यातूनच ही संकल्पना सुचली.सर्वसामान्यांनाही विनामूल्य प्रवेश

या नाटकाचे काही निवडक प्रयोग विनामूल्य करण्यात येणार आहेत. रसिकांनी नाटक पाहावं. आवडलं तर स्वेच्छेने पैसे द्यावेत. त्यांच्याकडे कुणीही तिकिटाची किंमत मागणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मदनलाल धिंग्रा यांचे क्रांतीकारी विचार आजही जगाला तारक आहेत आणि यापुढेही राहतील. हे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उपक्रम असल्याचंही पेडणेकर म्हणाले.


सावरकर-धिंग्रांच्या विचारांवर आधारित...

या नाटकाच्या निमित्ताने सावरकरांची व्यक्तिरेखा साकारण्याचं ‘चॅलेंज’ स्वीकारणारा निखिल म्हणाला की, सर्वसामान्यांना अंदमानमधील सावरकर ठाऊक आहेत, पण या नाटकात साकारलेले सावरकर ऐन तारुण्यातील २८ वर्षांचे आहेत. क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या विचारांची आणि मैत्रीची गाथा या नाटकात आहे. १९०६ ते १९०९ मध्ये सावरकर आणि धिंग्रा जेव्हा लंडनमध्ये राहात होते, त्या काळातील हे नाटक आहे.
पुस्तकाचा आधार...

आज आपल्याकडे सावरकरांचे उतारवयातील फोटो उपलब्ध आहेत. त्यामुळे २८ व्या वर्षी ते कसे दिसायचे हे ठाऊक नव्हतं. ही भूमिका साकारण्यापूर्वी सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास करण्यासाठी लेखक धनंजय कीर यांचं ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे पुस्तक वाचलं. त्यांचा त्या काळातील फोटो पाहून त्याप्रमाणे सावरकर साकारण्याचा प्रयत्न केल्याचं निखिल म्हणाला.


...अन् लोक पाया पडू लागले

निखिलने आजवर कधी चॅाकलेटी, तर कधी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत, पण या नाटकातील सावरकरांच्या भूमिकेने दैवत्व प्राप्त करून दिल्याची भावना निखिलने व्यक्त केली. नाटक पाहिल्यावर कौतुक करण्यासाठी रसिक गर्दी करतातच. प्रत्येक प्रयोगागणिक यात वाढच होत आहे. यातील काहीजण मला सावरकरांच्या गेटअपमध्ये पाहून जेव्हा चप्पल काढून चक्क पाया पडण्यासाठी खाली वाकतात, तेव्हा धन्य झाल्यासारखं वाटतं असं निखिल म्हणाला. हे सावरकरांवरचं त्यांचं प्रेम आहे, जे आज मला मिळत आहे.रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी...

‘चॅलेंज’ हे नाटक आता केवळ नाटक राहिलेलं नाही, तर आज हे एक मिशन बनलं आहे. ‘स्वेच्छा मूल्य’ तत्त्वावर हे नाटक रसिकांपर्यंत पोहोचवणं हा या मिशनचाच एक भाग आहे. ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोगामुळे प्रेक्षकांच्या संख्येत भरघोस वाढ झाली आहे. नाटक पाहिलेला एकही प्रेक्षक पैसे न देता जात नाही. कोणी पैशांच्या रूपात, तर कोणी चेकच्या रूपात या नाटकाला देणगी देत असल्याचं निखिलने सांगितलं.दिग्पाल लांजेकरचं दिग्दर्शन

सध्या ‘फर्जंद’ या सिनेमाच्या दिग्दर्शनामुळे गाजत असलेल्या दिग्पालनेच या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन आणि वेशभूषाही केली आहे. याशिवाय दिग्पालने मदनलाल धिंग्रांची भूमिकाही साकारली आहे. दिप्ती लेले, ज्ञानेश वाडेकर, जयेंद्र मोरे, शार्दूल आपटे, तेजस बर्वे, तुषार साळी, सुयश पुरोहित यांच्याही या नाटकात भूमिका आहेत.हेही वाचा-

स्त्रियांच्या समस्येसाठी ‘पळापळ’ करणार प्रदीप पटवर्धन!

तीन दशकांनंतर पुन्हा ‘मामला चोरीचा’संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा