Advertisement

EXCLUSIVE : ४७ वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’

१९७२ मध्ये हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्ये नवीन संचात रसिकांसमोर येणार आहे. कानेटकरांचं लेखन असलेलं हे अभिजात नाटक आहे. त्यावेळी डाॅ. श्रीराम लागूंनी हे नाटक बसवलं होतं आणि त्यात कामही केलं होतं.

EXCLUSIVE : ४७ वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’
SHARES

‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकामागोमाग प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे आणखी एक गाजलेलं नाटक मराठी रंगभूमीवर अवतरणार आहे. डाॅ. श्रीराम लागूंच्या अदाकारीनं रसिकांना भुरळ पाडणारं हे नाटक तब्बल ४७ वर्षांनी रंगभूमीवर येणार आहे. विनोदी लेखन-दिग्दर्शनात हातखंडा असलेले दिग्दर्शक राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करणार असून, गोविंद चव्हाण निर्माते आहेत. ‘ती फुलराणी’ आणि ‘श्री बाई समर्थ’ या नाटकांनंतर ‘हिमालयाची सावली’ रंगभूमीवर आणताना कशा प्रकारे तयारी सुरू आहे याची एक्सक्लुझीव्ह माहिती देशपांडे यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बातचित करताना दिली.


अभिजात नाटक…

१९७२ मध्ये हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्ये नवीन संचात रसिकांसमोर येणार आहे. कानेटकरांचं लेखन असलेलं हे अभिजात नाटक आहे. त्यावेळी डाॅ. श्रीराम लागूंनी हे नाटक बसवलं होतं आणि त्यात कामही केलं होतं. हे टिपीकल ऐतिहासिक नाटक नाही, तर सामाजिक आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या एका मोठ्या व्यक्तीच्या कौटुंबिक आयुष्यावर प्रकाश टाकणारं आहे. त्याच्या कुटुंबियांना काय भोगावं लागतं यावर आधारित आहे. 


संकल्पना आणि जुळवाजुळव

‘हिमालयाची सावली’ हे नाटक पुनरुज्जीवीत करावं ही मूळ संकल्पना गोविंद सावंत यांची. चव्हाण यांच्याकडे या नाटकाचे राईट्स होते, पण त्यांनी मध्यंतरी ते परत केले होते. एक दिवस बोलता बोलता त्यांनी मला या नाटकाबाबत सांगितलं, तेव्हा मी देखील त्यांना उर्जा दिली. मग त्यांनी पुन्हा हे राईट्स घेतले आणि आता ते रंगभूमीवर येणार आहे. सध्या बाकीच्या गोष्टींची जुळवाजुळव सुरू आहे.


तयारी सुरू…

सध्या तांत्रिक गोष्टींवर काम सुरू आहे. तालीम जून अखेरपासून सुरू होईल. आॅगस्टमध्ये हे नाटक रसिकांसमोर आणण्याचा विचार आहे. आज जरी जुन्या नाटकांचे मर्यादित प्रयोग करण्याचा ट्रेंड असला तरी आमचा मात्र तसा काहीच विचार नाही. ४७ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येणारं हे नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचावं यासाठी आमचा प्रयत्न असेल. 


कोणकोणते बदल?

बदल काहीच करणार नाही. खरं तर त्या वेळचं हे नाटक आम्ही कोणीच पाहिलेलं नाही. त्यामुळं हे पूर्वीच्या नाटकापेक्षा वेगळंच होईल. याचा सेट त्या काळानुसारच बनवला जाईल. त्या काळात कशी घरं होती याचं वर्णन कानेटकरांनी लिहिलेलं आहे. त्याप्रकारे सेट उभा केला जाईल. कानेटकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन करणार आहोत. त्यांचं एक वाक्यही आम्ही बदलू शकत नाही.


कलाकारांबाबत…

कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. काही आॅप्शन्स डोक्यात आहेत. त्यांना वाचनासाठी दिलं आहे. कास्टिंग अर्थातच मोठं असणार. डाॅ. श्रीराम लागू, शांता जोग आणि अशोक सराफ या मराठी रंगभूमीवरील तीन हुकूमी एक्क्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर १९७२ मध्ये रसिकांवर मोहिनी घातली होती. त्यामुळं त्याच ताकदीचे आजच्या पिढीतील कलाकार घेऊन कानेटकरांच्या लेखनाला उचित न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या तरी याबाबत काहीच निश्चित सांगता येणार नाही.


सावलीचं नाटक

तात्यासाहेब हे या नाटकातील मेन कॅरेक्टर असलं तरी हे नाटक खरं तर त्यांच्या पत्नीवर आधारित आहे. पुरुषाच्या मागे ठामपणं उभ्या राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं हे नाटक आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पत्नीला काय भोगावं लागतं ते इतरांना ठाऊक नसतं. हे नाटक त्यावरच आधारित आहे. हे नाटक त्या पतीच्या मागं असणाऱ्या ‘सावली’चं असल्यानं त्याचं शीर्षक ‘हिमालयाची सावली’ आहे.


तीन अंकी नाटक…

हे नाटक पूर्वीही तीन अंकी होतं. नव्या संचात सादर करतानाही तीन अंकीच असेल. यात दोन मध्यंतरं होतील. नाटकाचा कालावधी फार मोठा नसेल. तो दोन अंकांच्या नाटकांइतकाच असेल, पण तीन अंकात सादर करणं ही मूळ नाटकाची गरज आहे. त्यामुळं प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा अनुभव ठरेल. हे लेखकानं घट्ट बांधलेलं नाटक आहे. ते विस्कटण्याची आमची हिंमत नाही आणि आम्हाला तो अधिकारही नाही. तशी गरजही नाही.


विनोदी नाही पण…

हे नाटक विनोदी नसलं तरी पाहताना लोकांना हसू येईल. जुन्या नाटकात तात्यासाहेबांचं कॅरेक्टर लागूंनी केलं होतं आणि त्यांच्या पत्नीची भूमिका शांता जोग यांनी वठवली होती. तातोबाची व्यक्तिरेखा अशोक सराफ यांनी रंगवली होती. नव्या संचातील नाटक प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्राॅडक्शन्स निर्मित सुप्रिया प्राॅडक्शन्स प्रकाशित आहे. गोविंद चव्हाण आणि प्रकाश देसाई हे नाटक प्रस्तुत करीत आहेत. या नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत असून, अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.हेही वाचा -

EXCLUSIVE : अंशुमन बनला 'एकच प्याला'मधील तळीराम
संबंधित विषय
Advertisement