'गणरंग'चे पुनरागमन

Mumbai
'गणरंग'चे पुनरागमन
'गणरंग'चे पुनरागमन
See all
मुंबई  -  

मराठी रंगभूमीवर आशयघन आणि उच्च निर्मितीमूल्यं असलेली एकाहून एक सरस नाटकं देणारी ‘गणरंग’ संस्था नवंकोरं नाटक घेऊन मराठी नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचं शीर्षक आहे- ‘तोच परत आलाय.’ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा विविधांगी भूमिकांना न्याय देणारं रंगभूमी, चित्रपट, जाहिरात आणि मालिकाक्षेत्रातले आवाजी व्यक्तिमत्त्व दिवंगत विनय आपटे यांच्या प्रतिभेची साक्ष पटवून देणारं ‘तो परत आलाय’ या नाटकाने नाट्यरसिकांची वाहवा मिळवली होती. त्याच शीर्षकाशी साधर्म्य राखणाऱ्या ‘तोच परत आलाय’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग येत्या सात जुलैला दुपारी चार वाजता दादरमधल्या शिवाजी मंदिरमध्ये होणार आहे.


‘तोच’ कोण आहे?

अत्याधुनिक आणि कमालीच्या परिणामकारक अशा आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे अपत्यहीन दांपत्याच्या संसारात चैतन्य फुलवण्याचं काम केलं आहे. पण विज्ञानाचा हा चमत्कार एखाद्या कुटुंबात नवं वादळ कसं उभं करू शकतो? हे दाखवण्याचा प्रयत्न ‘तोच परत आलाय’ या नाटकातून होणार आहे. विज्ञानाच्या वासलेल्या ‘आ’ मध्ये भक्ष्य जाऊ शकणारं कुटुंब, मानवी मनाची गुंतागुंत आदींवर प्रकाश टाकत एका अतिशय गंभीर आणि सामाजिक विषयावर रंगमंचीय आविष्कारातून व्यक्त होण्याचा प्रयत्न या नाटकातून होणार आहे. गिरीश परदेशी, शृजा प्रभुदेसाई, संग्राम समेळ आदींच्या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचं लेखन प्रवीण धोपट आणि दिग्दर्शन मंगेश सातपुते यांनी केलं आहे.  ‘गणरंग’चा नाट्यप्रवास

प्रथितयश अभिनेत्रीची कौटुंबिक बाजू उलगडून दाखवणारं ‘अभिनेत्री’, फिरत्या रंगंमंचाची जादुई अनुभूती रसिकप्रेक्षकांना देणारं ‘रानभूल’,  पुण्यातल्या सत्य घटनेवर आधारित शोकांतिका ‘कुसुम मनोहर लेले’, दुर्दैवी अरुणा शानभागवर झालेल्या पाशवी अत्याचारावर भाष्य करणारं ‘कथा अरुणाची’, स्वतःचं छोटंसं घर असावं, हे मध्यमवर्गीयांच्या मनात ‘घर’ करून राहिलेलं स्वप्न वास्तवदर्शी स्वरुपात मांडणारं ‘वन रुम कीचन’, राजेश खन्नाच्या अभिनयाने नटलेल्या ‘बावर्ची’ची आठवण करुन देणारं ‘शुभ बोले तो नारायण’, आज मराठीत स्टारडम मिळवणाऱ्या सिद्धार्थ जाधवला त्याचे अभिनयगुण दाखवण्याची पहिली मोठी संधी देणारं तुमचा 'मुलगा करतो काय?', महात्मा गांधी यांच्या हत्येची दुसरी बाजू मांडणारं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सह इतरही अनेक दर्जेदार नाटकांचा नजराणा रसिकप्रेक्षकांना देणाऱ्या ‘गणरंग’च्या वतीने गेल्या काही वर्षांत नवं नाटक सादर झालं नव्हतं. बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येताना निर्मात्या वैजयंती कुलकर्णी-आपटे यांनी आजच्या काळाला अनुरूप विषय निवडला आहे.


"गणरंग म्हणजे विनय आपटे हे नव्याने सांगायला नकोच. विनय आपटे यांच्या लौकिकाला साजेशी निर्मितीमूल्यं घेऊन हे नाटक आम्ही रंगभूमीवर आणतोय. ‘गणरंग’च्याच ‘तो परत आलाय’शी शीर्षकाचं असलेलं साधर्म्य हा योगायोग आहे. या नाटकाची जातकुळी पूर्णपणे वेगळी आहे."

वैजयंती कुलकर्णी आपटे, निर्मात्या, तोच परत आलाय


Loading Comments
© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.