Advertisement

३ जूनला रंगणार प्रायोगिक नाट्य महोत्सव; अरुण नलावडे आणि निर्मिती सावंत यांना पुरस्कार

व्यावसायिक रंगभूमीवर नावारूपाला आलेल्या कलाकार-तंत्रज्ञ-निर्मात्यांनीच आता पुढाकार घेत प्रायोगिक रंगभूमीला नवसंजीवनी मिळवून देण्याचं काम हाती घेतलं आहे.

३ जूनला रंगणार प्रायोगिक नाट्य महोत्सव; अरुण नलावडे आणि निर्मिती सावंत यांना पुरस्कार
SHARES

व्यावसायिक रंगभूमीचा मूळ पाया असलेल्या प्रायोगिक रंगभूमीकडं आजवर तसं दुर्लक्षच झालं आहे. असं असलं तरी व्यावसायिक रंगभूमीवर नावारूपाला आलेल्या कलाकार-तंत्रज्ञ-निर्मात्यांनीच आता पुढाकार घेत प्रायोगिक रंगभूमीला नवसंजीवनी मिळवून देण्याचं काम हाती घेतलं आहे.


महोत्सवाचं दुसरं वर्ष

आज व्यावसायिक रंगभूमीवर कलाकार म्हणून अभिमानानं मिरवणारे बरेच कलावंत प्रायोगिक रंगभूमी गाजवून पुढे आले आहेत. याचीच जाण ठेवून या मंडळींनी प्रायोगिक नाटकांसाठी काहीतरी ठोस करण्याचा निश्चय केला. त्यातूनच प्रायोगिक नाट्य महोत्सवाची संकल्पना पुढे आली आणि गत वर्षाप्रमाणे यंदा ३ जून रोजी प्रायोगिक नाट्य महोत्सव रंगणार आहे. मराठी नाटक समूह, प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्या सहयोगानं आयोजित केल्या जाणाऱ्या प्रायोगिक नाट्य महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे.


मान्यवरांच्या कार्याचा पुरस्कार

३ जूनला दादर मधील शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून या नाट्य महोत्सवाला सुरुवात होईल. एक दिवसाच्या या नाट्य महोत्सवामध्ये कल्याणच्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाचं 'मिशन ५९', गोव्याच्या हंस संगीत मंडळींचं 'अव्याहत' आणि मुंबईच्या माध्यम कलामंच या संस्थेच्या 'खगनिग्रह' या नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येतील. या सोबतच मराठी रंगभूमीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या काही मान्यवरांच्या कार्याचा पुरस्कार देऊन या महोत्सवात गौरवही करण्यात येईल.


महोत्सवातच पुरस्कार प्रदान 

या अंतर्गत, ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांना 'जीवनगौरव पुरस्कार' घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांना आणि ज्येष्ठ दिग्दर्शिका विद्या पटवर्धन यांना 'प्रदीर्घ योगदान पुरस्कार' देण्यात येणार आहे. तसंच, प्र. ल. मयेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना आणि शरद तळवलकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांना जाहीर झाला आहे. प्रायोगिक नाट्य महोत्सवातच हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसोबतच विशेष योगदान पुरस्कारही देण्यात येणार आहेत. 


विशेष योगदान पुरस्कार

वर्धा येथे 'अॅग्रो थिएटर'ची संकल्पना राबवून तिचा प्रसार करणारे प्रायोगिक रंगकर्मी हरीश इथापे आणि पुणे येथे 'इंटिमेट थिएटर' संकल्पनेचा प्रसार करणारे प्रायोगिक रंगकर्मी प्रदीप वैद्य यांची विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दुसऱ्या प्रायोगिक नाट्य महोत्सव आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, आशीर्वाद मराठे, चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर, निर्मिती सावंत, अनिल बांदिवडेकर, शीतल तळपदे, कौशल इनामदार, जयवंत वाडकर, दीपक करंजीकर, श्रीनिवास नार्वेकर, महेंद्र तेरेदेसाई, राजीव जोशी, आशुतोष घोरपडे, मानसी मराठे, आभास आनंद यांच्यासह अनेक रंगकर्मी यावेळी उपस्थित होते.हेही वाचा -

EXCLUSIVE : प्रियाला पुन्हा लागले रंगभूमीचे वेध

आजच्या व्यक्तिरेखांसोबत संतोषचं 'यदा कदाचित रिटर्न'
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा