Advertisement

आजच्या व्यक्तिरेखांसोबत संतोषचं 'यदा कदाचित रिटर्न'

संतोष पवार हे मराठी रंगभूमीपासून टेलिव्हीजनपर्यंत सर्वांना आपलं वाटणारं नाव... संतोष आता जवळजवळ २० वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या 'यदा कदाचित' या नाटकाच्या सिक्वेलसह रंगभूमीवर परतला आहे.

आजच्या व्यक्तिरेखांसोबत संतोषचं 'यदा कदाचित रिटर्न'
SHARES

संतोष पवार हे मराठी रंगभूमीपासून टेलिव्हीजनपर्यंत सर्वांना आपलं वाटणारं नाव... संतोष आता जवळजवळ २० वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या 'यदा कदाचित' या नाटकाच्या सिक्वेलसह रंगभूमीवर परतला आहे.


पौराणिक व्यक्तिरेखांवर आक्षेप 

'यदा कदाचित' या नाटकानं जितकी लोकप्रियता मिळवली तितकेच वादही निर्माण केले होते. समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या नाटकातील पौराणिक व्यक्तिरेखांवर आक्षेप घेत या नाटकाला विरोध करण्यात आला होता. तरीही या नाटकानं अल्पावधीत साडे तीन हजार प्रयोगांचा टप्पा गाठत विक्रमी लोकप्रियता मिळवली होती. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी 'यदा कदाचित रिटर्न'च्या रूपात संतोष या नाटकाचा सिक्वेल मराठी रंगभूमीवर घेऊन आला आहे.


यदा कदाचित रिटर्न

'यदा कदाचित रिटर्न' या नव्या कोऱ्या नाटकाबाबत 'मुंबई लाइव्ह'शी खास बातचित करताना संतोष म्हणाला की, 'यदा कदाचित' या नाटकानं आमच्या टिमला भरभरून प्रेम दिलं आहे. हे नाटक जुन्या पिढीनं डोक्यावर घेतलं असलं तरी नवीन पिढीनं मात्र पाहिलेलं नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या विचारानं 'यदा कदाचित रिटर्न'चा डाव मांडला आहे. बऱ्याच दिवसांपासून एक विषय डोक्यात घोळत होता, पण तो मांडताना खूप काळजी घेणं गरजेचं होतं. आताचं वातावरण त्या विषयासाठी पोषक असल्यानं पुन्हा एकदा एक धाडस केलं आहे.


पोट धरून हसवतीलही

'यदा कदाचित'मुळं झालेल्या वादामुळं संतोषला फार मन:स्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळं यावेळी खूप सांभाळून पावलं टाकल्याचं सांगत संतोष म्हणाला की, 'यदा कदाचित'मुळं झालेल्या वादानं हैराण झालो होतो. एक चांगलं नाटक अवेळी बंद करावं लागलं होतं. त्यामुळं 'यदा कदाचित रिटर्न' करताना तसं काहीही होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पौराणिक व्यक्तिरेखांना हात न लावता मी या नाटकात आजच्या काळातील व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. या व्यक्तिरेखा आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करतीलच, पण त्यासोबतच रसिकांना पोट धरून हसवतीलही.


नमन-दशावतार यावर आधारित 

नाटकाचा सिक्वेल बनवताना काळानुरूप बरेच बदल करण्यात आल्याचं संतोषनं सांगितलं. तो म्हणाला की, 'यदा कदाचित' आणि 'यदा कदाचित रिटर्न' या दोन नाटकाचा फॅारमॅट जरी सेम असला तरी कथानक फार भिन्न आहे. त्या नाटकात असलेली तळ कोकणातील बोलीभाषा आणि लहेजा या नाटकातही कायम असेल. व्यक्तिरेखा जशा बदलल्या आहेत, तसे काही संदर्भही बदलण्यात आले आहेत, जे आजच्या काळाशी सुसंगत असतील. या नाटकाचा मूळ पॅटर्न नमन-दशावतार यावर आधारित असल्यानं त्याला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळेच तर या नाटकाला 'यदा कदाचित रिटर्न' असं शीर्षक दिलं आहे.


१६ नवीन कलाकारांना संधी

'यदा कदाचित'मध्ये संतोष पवार नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये रसिकांसमोर आला होता. लेखन-दिग्दर्शनासोबतच त्यानं या नाटकातील जवळजवळ सर्वच मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या, पण 'यदा कदाचित रिटर्न'मध्ये मात्र त्यानं पडद्यामागं राहून लेखन-दिग्दर्शन-गीतलेखन करणंच पसंत केलं आहे. या नाटकात त्यानं १६ नवीन कलाकारांना संधी दिली आहे. त्या काळी फुलटॉस कॉमेडी म्हणून गाजलेल्या 'यदा कदाचित'चा सिक्वेल असलेलं 'यदा कदाचित रिटर्न्स' हे नाटक श्री दत्त्तविजय प्रोडक्शन या नाट्यसंस्थेनं रंगभूमीवर आणलं आहे.



हेही वाचा -

नागा साधूच्या रूपात सैफ

'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त ?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा